आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Money News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

काळ्या पैशांवर डोळा; आर्थिक गुप्तचर संस्थांचा संशयास्पद व्यवहारांवर नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर काळा पैसा ओतला जाण्याचा आर्थिक गुप्तचर संस्थांचा अंदाज असून रोख्यांमार्फत होणा-या देवाण-घेवाणीवर या संस्थांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. खासगी नोकरभरती कार्यक्रमांतर्गत बेकायदेशीर पैसा ओतला जात असल्याचे केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाच्या निदर्शनास आले आहे.


आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित गुप्त माहिती गोळा करून त्या प्रकरणांचा छडा लावण्याची जबाबदारी असलेल्या अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाने (सीईआयबी) निवडणुकीत काळा पैसा ओतला जात असल्याच्या काही प्रकरणांचा छडा लावला आहे. एखादी व्यक्ती किंवा 50 जणांच्या गटाची रोखे देण्यासाठी निवड करण्याच्या माध्यमातून काळा पैसा निवडणुकीत ओतला जात असल्याचे सीईआयबीच्या निदर्शनास आले आहे. निवडणुकीमध्ये रोखे आणि इक्विटीशी संबंधित गुंतवणुकीचा काळा पैसा हस्तांतरित करून आमिषे दाखवण्यासाठी गैरवापर केला जाऊ शकतो, असा सूत्रांचा कयास आहे.


मतदारांना आमिषे दिली जाण्याची दाट शक्यता
ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा नवा फंडा
खासगी नियुक्ती कार्यक्रम अर्थात प्रायव्हेट प्लेसमेंट प्रोग्राम (पीपीपी) हा ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा नवा फंडा आहे. या पद्धतीत एखादी कंपनी सूचिबद्ध करण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अधिमान्य रोखे वाटप केले जाते, असे आर्थिक गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


रोखे, पी-नोट्सद्वारे कोट्यवधींचे बेनामी व्यवहार
३ 2280 कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार गेल्या वर्षी पीपीपीच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचे केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाच्या शोध मोहिमेत उघडकीस आले होते. गेल्या वर्षीच पीपीपीच्या माध्यमातून 881 संशायस्पद देवाण-घेवाणीद्वारे काळा पैसा वितरित करण्यात आल्याचेही आर्थिक गुप्तचर विभागाने उघडकीस आणले होते.
३ 1.73 लाख कोटी रुपये गुंतवणूक पी-नोट्सच्या माध्यमातून या वर्षीच्या एकट्या फेब्रुवारी महिन्यात शेअर बाजारात करण्यात आली आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.


काळ्या पैशांच्या ‘पी-नोट्स’ : परदेशातील संस्था किंवा व्यक्तींना भारतातील शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचे साधन असलेल्या पी-नोट्स म्हणजेच पार्टिसिपेटरी नोट्सद्वारे होणा-या गुंतवणुकीवरही गैरवापर होऊ नये म्हणून नजर ठेवली जात आहे. काळा पैसा शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी पी- नोट्सचा गैरवापर होत आहे. सूचिबद्ध कंपन्या किंवा अन्य स्रोतांमार्फत निवडणुकीसाठी काळा पैसा ओतला जाऊ नये यासाठी सेबीनेही आपली यंत्रणा अधिक दक्ष केली आहे.