आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इस्रायल संबंधांवर आधारित पुस्तक प्रकाशित, इतिहासाचा वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेसमोर भारताने इस्रायलच्या युद्ध गुन्ह्यांविषयी तटस्थ भूमिका घेतली. गाझा पट्ट्यातील युद्धादरम्यान इस्रायलने मानावाधिकारांचे उल्लंघन केले. यासंदर्भात गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांनी प्रस्ताव पारित केला. इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धात भारताने घेतलेली तटस्थ भूमिका भारत-इस्रायल संबंधांना पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली. भारत गेल्या ४२ वर्षांपासून इस्रायलशी तटस्थ धोरण ठेवून आहे, याचा सविस्तर उलगडा करणारे पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले आहे. नेदरलँड येथील राजकीय विश्लेषक निकोलस ब्लारेल यांनी ‘द इव्हॉल्युशन ऑफ इंडियाज इस्रायल पॉलिसी’या पुस्तकाचे लेखन केले. यात भारत-इस्रायल संबंधांचे सविस्तर वर्णन-विश्लेषण केले आहे.

इस्रायलशी का राखले अंतर?
तुर्कस्तान, म्यानमार या देशांनी मध्य पूर्वेतील देशांशी संबंध सुदृढ ठेवतानाच इस्रायलशीदेखील परराष्ट्रीय बंध मजबूत केले. मात्र, भारत १००% संवादास अद्यापही का राजी नाही.भारत -इस्रायल संबंधांची प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय कारणमीमांसा या पुस्तकात आहे. १९३८ मध्ये स्वतंत्र पॅलेस्टाइन निर्मितीला महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरूंनी विरोध दर्शवला होता. १९६० ते १९७० दरम्यान भारत -इस्रायल व्यूहात्मक संबंध दृढ झाले होते. मात्र, यात धोरणात्मक बाबी जास्त महत्त्वाच्या राहिल्या. इंदिरा गांधी सत्तेत असताना मात्र त्यांनी पॅलेस्टाइन लिबरेशनला पाठिंबा दिला होता. पुन्हा राजीव गांधींच्या काळात इस्रायलशी उच्चस्तरीय चर्चा करून संबंध दृढीकरणासाठी प्रयत्न झाले. दोन्ही देशांत सातत्याने प्रादेशिक व्यूहरचनेसाठीच बोलणी झाल्याचे यावरून दिसून येते.

प्रादेशिक सत्तासंतुलनाचा प्रभाव
भारत-इस्रायल संबंधांवर प्रादेशिक सत्तासंतुलानाचा प्रभाव राहिला. इराण-इराक संघर्ष, अरब देशांशी संबंध, अफगाणिस्तानातील राजकीय अस्थिरता, आखाती युद्ध (१९९१), अरब देशांचा पाककडे असलेला कल, अरबस्तानातील भारताचे आर्थिक हितसंबंध या सर्व कारणांचे अभ्यासू विश्लेषण ब्लारेल यांच्या पुस्तकात करण्यात आले आहे. राष्ट्र म्हणून दोन्ही देशांत संबंध प्रस्थापित करण्यातील अडथळ्यांचे आकलन करून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.