आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bring Gold From Abroad, Sell In Double Price In India

परदेशातून सोने आणा, दामदुप्पट भावात विका; हवाला टोळ्यांचा कायदेशीर उद्योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - परदेशातून एक किलो सोने आणण्याचा नवा उद्योग फळफळला असून आता परदेशातून सोने आणणा-या लोकांवर आयकर खात्याची वक्रदृष्टी पडली आहे. सोन्यावर कर भरणा-या प्रत्येक प्रवाशाची आर्थिक तपशिलाची अबकारी खात्याकडून आयकर खात्याला देवाणघेवाण केली जात आहे. परदेशातून सोने आणून ते दामदुप्पट भावाने विकण्याचा नवा फंडा हवाला टोळ्यांनी शोधून काढला आहे.


परदेशात सहा महिन्यांपेक्षा अधिक वास्तव्य करणा-या भारतीय व्यक्तीस एक किलो सोने खरेदी करून भारतात आणता येते. त्यावर दहा टक्के कर भरावा लागतो. हा कर ज्या देशात सोने खरेदी केले त्या देशाच्या चलनात द्यावा लागतो. याशिवाय परदेशात एक वर्षापेक्षा अधिक वास्तव्य असल्यास पुरुषाला 50 हजार रुपयांपर्यंतचे दागिने आणि महिलेस एक लाख रुपयांपर्यंतचे दागदागिने भारतात आणता येतात. या दागदागिन्यांवर कोणताही कर आकारला जात नाही.
सन 2013-14 मध्ये परदेशातून 3 हजार किलो सोने भारतात आणले गेले. या सोन्यावर अबकारी करही भरण्यात आला आहे,असे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिका-यांनी सांगितले. परदेशातून एक किलो सोने आणणा-या लोकांमध्ये वाढ झाली आहे. यामागे हवाला व्यवहार करणा-या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा हात असल्याचा संशय आहे. कर भरल्यानंतर परदेशातून आलेल्या व्यक्तीकडून हवाला टोळ्या हे सोेने खरेदी करतात व नंतर व्यापा-यांना विकत असावेत असा संशय आहे. त्यामुळेच पैशांचा स्रोत कळण्यासाठी आता परदेशातून सोने आणणा-या प्रत्येकाच्या पॅन कार्डचा तपशील आयकर खात्याला दिला जात आहे.


दोन लाखांची झटपट कमाई
परदेशातून दहा तोळे सोने आणून विकल्यास किमान दोन लाख रुपयांची रग्गड कमाई होते. हा फायदा कमावण्यासाठी हवाला टोळ्या प्रवाशांचा उपयोग करत असाव्यात असा संशय आहे; परंतु कायदेशीर मार्गानेच हा व्यवहार होत असल्याचे अधिका-याने सांगितले.
गुप्तचर यंत्रणा हतबल : कायद्यातून पळवाट काढून हा उद्योग करण्याच्या नव्या मोड्स ऑपरेंडीसमोर महसूल गुप्तचर अधिकारीही हतबल आहेत. हा व्यवहार रोखणे अवघड आहे. कारण आणलेल्या सोन्यावर कर भरलेला असतो. त्यामुळे ते कायदेशीर ठरते, असे एका अधिका-याने सांगितले.
केरळात अधिक फळफळला : परदेशातून कायदेशीर मार्गाने किती सोने आणले, याची देशभरातील एकत्रित आकडेवारी महसूल गुप्तचरांकडे नाही; परंतु हा उद्योग दक्षिण भारतातील विशेषत: केरळमध्ये अधिक सुरू आहे. त्यामुळे विमान प्रवासी व सराफा व्यापा-यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी सक्त वसुली संचालनालयाचीही मदत घेतली जात आहे.


भारतात सर्वाधिक ग्राहक
सोने हा भारतीयांचा वीक पॉइंट समजला जातो. सणासुदीला सोन्यावर ग्राहकांच्या उड्या पडतात. सन 2012-13 या आर्थिक वर्षात भारतात 830 टन सोने आयात करण्यात आले होते. सोने खरेदीचे हे वेड अर्थमंत्रालयाच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय झाले होते. त्यामुळे खरेदीला आळा घालण्यासाठी कर लावण्यात आला.