आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Prime Minister Cameroon Eagar To Meet Modi, Good Relation With Gujrat

ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरॉन मोदींना भेटण्यास उत्सुक, गुजरातसोबत उत्तम संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटण्यास आपण उत्सुक आहोत असे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांनी सांगितले. गुजरातसोबत ब्रिटनचे यापूर्वीपासूनच उत्तम संबंध आहेत. ते यापुढेही कायम राहतील, असे ते म्हणाले.
श्रीलंकेतील चोगम परिषदेनिमित्त कॅमेरून छोटेखानी भारत दौ-यावर आले आहेत. त्यांनी गुरुवारी मनमोहनसिंग यांची सात रेसकोर्स रस्त्यावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भारतीय उद्योगपतींशीही कॅमेरॉन यांनी चर्चा केली. मोदींना भेटण्यात आनंदच आहे. योग्य वेळ येताच त्यांची भेट घेईन. गुजरातसोबत सौहार्दपूर्ण संबंधांची पेरणी यापूर्वीच झाली आहे. ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांनीही मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळेसंबंध आहेतच, ते यापुढेही कायम राहतील, असे ते म्हणाले. मोदींची भेट चांगलीच आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचे आमचे धोरण आहे. अर्थात कुणाला निवडून द्यायचे, याचा निर्णय भारतीय जनतेवर अवलंबून आहे; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीला, नेत्याला भेटण्यास माझी हरकत नाही, असे कॅमेरॉन यांनी स्पष्ट केले.
बंदी घालणारे, भेट घेणारे ब्रिटिश
सन 2002 च्या गुजरात दंगलीनंतर माणुसकी, मानवी हक्क पायदळी तुडवल्याचे सांगून ब्रिटनने मोदींवर बहिष्कार टाकला होता. त्यापाठोपाठ अमेरिकेसह इतर पाश्चात्त्य राष्ट्रांनीही मोदींना वाळीत टाकले होते व त्यानंतर बंदी उठवणारेही ब्रिटनच पहिले राष्ट्र ठरले आहे.
तीन वर्षांत तीन दौरे
कॅमेरॉन यांची गेल्या तीन वर्षांतील ही तिसरी भारत भेट आहे. उभय देशांदरम्यान अनेक गोष्टी सारख्या आहेत. शिवाय जुने संबंध आहेत, त्यामुळे पंतप्रधानांशी आणखी भेटी, अनौपचारिक चर्चा करण्यास कॅमेरॉन यांनी अनुकूलता दर्शवली.
मोदींचे आव्हान भाजपलाच
नरेंद्र मोदींची बेलगाम वक्तव्ये पाहता ते भाजपसमोरच आव्हान आहे.काँग्रेससमोर नव्हे असे केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल म्हणाले. मोदींची वक्तव्ये भाजपलाच अडचणीत आणत आहेत. मोदीं मोठ मोठे दावे करीत आहेत पण ते जनतेसमोर उघडे पडतील. काँग्रेसचा पंजा ‘खूनी पंजा’ असल्याचे मोदींचे वक्तव्य हे सुध्दा त्याच पठडीतील आहे.
कॅमेरॉन हावडा ब्रिजवर
ब्रिटिश राजमधील एक मानाचे पान ठरलेल्या हावडा ब्रिजला कॅमेरॉन यांनी गुरुवारी भेट दिली. हुगळी नदी व कोलकाता शहराला जोडणारा हा ऐतिहासिक पूल सन 1943 मध्ये खुला करण्यात आला होता. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या काळातील इमारती पाहण्यासाठी कॅमेरॉन डलहौसी चौकातही गेले होते. पश्चिम बंगालचे सचिवालय रायटर्सची इमारतही ब्रिटिशकालीन आहे. डलहौसी चौकाचे आता बीबीडी बाग असे नामांतर करण्यात आले आहे.
मनमोहनसिंगांच्या निर्णयाची कदर : चोगम परिषदेस अनुपस्थित राहण्याचा मनमोहनसिंग यांच्या निर्णयाची कदर करून श्रीलंकेतील गृहयुद्धाबद्दल योग्य चौकशी झाली पाहिजे, असे कॅमेरॉन म्हणाले.