आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसप नेते दीपक भारद्वाज हत्या प्रकरण : दोन जण पोलिसांच्या ताब्यात, एक डझन लोकांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रजोकरी भागातील फार्महाऊसवर बहुजन समाज पक्षाचे नेते दीपक भारद्वाज यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. मंगळवारी सकाळी दिल्लीमध्ये खळबळ उडवून देणा-या या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना संशय आहे की, हे दोघे फार्महाऊसवर झालेल्या गोळीबारात सहभागी होते.

दोन दिवसात दिल्ली पोलिसांनी या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात एक डझनहून अधिक लोकांची चौकशी केली आहे. अब्जाधीश नेते आणि उद्योगपती दीपक भारद्वाज यांच्यापासून वेगळे राहत असलेला त्यांचा मुलगा आणि पत्नी यांचीही चौकशी झाली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

तीन अज्ञात हल्लेखोरांनी भारद्वाज यांच्या फार्महाऊसवर जाऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यात तीन जणांनी हा हल्ला केला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारद्वाज यांचा शवविच्छेदन अहवाल आज (बुधवार) प्राप्त झाला आहे. त्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याचे म्हटले आहे. दोन गोळ्या त्यांच्या छातीवर तर एक गोळी पाठीमागून मारण्यात आली होती.

दिल्ली पोलिस आयुक्त निरजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसप नेते भारद्वाज यांच्या रजोकरी येथील फार्महाऊसवर तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिस कंट्रोलरुमला या घटनेची माहिती १०.३० वाजता मिळाली. आयुक्तांनी सांगितले की, तीन हल्लेखोर फार्महाऊस बुक करण्याच्या बहान्याने तेथे आले. त्यांनी फार्म हाऊसच्या मालकाची विचारपूस केली. फार्महाऊसचे मालक दीपक भारद्वाज त्यांच्या समोर आल्याबरोबर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. भारद्वाज यांना तीन गोळ्या लागल्यानंतर काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

या हायप्रोफाईल गोळीबार प्रकरणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर हे सराईत असण्याची शक्यता आहे. त्यांनी हल्ला करण्याआधी या भागाची रेकी केली असण्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.