आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bussinessmans Assures 4.5 Lakh Crore\'s Investment In Digital India

Digital India : ४.५ लाख कोटी गुंतवणूक, १८ लाख राेजगारांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाची सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत खासगी कंपन्यांनी ४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे १८ लाख लोकांना रोजगार मिळेल. सायबर सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतानाच मोदी यांनी ‘रक्तहीन युद्धा’पासून सावधही केले. सायबर युद्धाची आव्हाने पेलण्यासाठी आपण तोडगा काढायला हवा, असे मतही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले.

मोदी म्हणाले, ‘डिजिटल इंडिया’मुळे भ्रष्टाचार निर्मूलन, पारदर्शक कारभार आणि श्रीमंत- गरीब यांच्यातील दरी कमी करण्यात मदत मिळेल. आम्ही ई-गव्हर्नन्सपासून एम-गव्हर्नन्सकडे जाऊ. एम- गव्हर्नन्स म्हणजे मोबाइल गव्हर्नन्स, मोदी गव्हर्नन्स नाही. संपूर्ण सरकार तुमच्या मोबाइलवर असेल. इनोव्हेशनवर भर देतानाच, मेक इन इंडियाप्रमाणेच डिझाइन इंडियाही महत्त्वाचा आहे.अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, डिजिटल इंडियाद्वारे तंत्रज्ञान ही जीवनपद्धती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. जगातील सर्वात मोठ्या रिटेलर्सकडे एकही रिटेल स्टोअर नाही. तंत्रज्ञानाची हीच ताकद आहे.
या कार्यक्रमात मोठ्या उद्योगपतींनी या योजनेत गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले...

मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज
२.५ लाख कोटी गुंतवणार पाच लाख लोकांना रोजगार मिळेल. जियो डिजिटल इंडिया स्टार्टअप फंड बनवला जाईल. मोबाइल फोन निर्मात्यांसह स्वस्त हँडसेट बनवले जातील.

अनिल अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स एडीएजी समूह
डिजिटल, क्लाउड, दूरसंचारमध्ये समूह १० हजार कोटी गुंतवणार. वर्षअखेरीस ५ क्लाउड एक्सचेंज पॉइंट सुरू होतील. त्यामुळे ऑनलाइन स्टोअरेज सोपे होईल.

पिंग चेंग, सीईओ, डेल्टा
कंपनी दहा वर्षआंत आयटीत ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळतील.

सायरस मिस्त्री, अध्यक्ष, टाटा समूह
टाटा समूह यावर्षी ६० हजार आयटी व्यावसायिकांची भरती करणार आहे. टीसीएसने डिजिटल बिझनेसद्वारे देशात ३० हजार कोटी रुपयांचा महसूल तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

सुनील भारती मित्तल, अध्यक्ष, भारती एंटरप्रायजेस
पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. इलेक्ट्रॉनिक्स आयात कमी करण्यासाठी काम करणार. डिजिटल इंडियात कमी कालावधीत भारतात बदल घडवण्याची क्षमता आहे.

कुमारमंगलम बिर्ला, अध्यक्ष, आदित्य बिर्ला समूह
पाच वर्षांत डिजिटल प्रकल्प, पायाभूत सुविधांत ४५ हजार कोटींची गुंतवणूक करेल. आयडिया सेल्युलर डिजिटल इंडियासाठी पायाभूत सुविधा तयार करेल. मोबाइल आधारित आरोग्य, शिक्षण सुविधा देऊ.

अजीम प्रेमजी, अध्यक्ष, विप्रो
डिजिटल इंडिया व्हिजन खूप मजबूत आहे. त्याद्वारे सरकारी सेवांची माहिती तत्काळ मिळेल. सर्वांना डिजिटल इन्फ्रा आणि सरकारी सेवा मागणीनुसार मिळाल्याने ‘डिजिटल अंतर’ संपेल.

पवन मुंजाल, अध्यक्ष, हिरोमोटो कॉर्प
समूह इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीत पुढाकार घेण्यास तयार आहे. २०२० पर्यंत इलेक्ट्रॉनिक्सची आयात कच्च्या तेलाच्या आयातीपेक्षा जास्त असेल.

अनिल अग्रवाल, अध्यक्ष, वेदांता समूह
४० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून एलसीडी पॅनल बनवण्याचा प्रकल्प सुरू करू. डिजिटल इंडियाद्वारे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. मोठ्या संख्येने नोकऱ्या मिळतील.