नवी दिल्ली - मोदी लाटेची परीक्षा असे ज्या निवडणूकीबद्दल बोलले जात होते, त्या नऊ राज्याच्या विधानसभेच्या 33 आणि लोकसभेच्या तीन जागांचे निकाल आज जाहीर होत आहे. लोकसभेत ज्या राज्याने भाजपच्या पारड्यात भरभरुन दान टाकले त्या उत्तर प्रदेशात आता त्यांना पराभवाला समोरे जावे लागत आहे. समाजवादी पार्टीने राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यातील विधानसभेच्या 11 जागांपैकी समाजवादी पक्षाने दोन आणि भाजपने एका ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. इतर पाच जागांवर सप तर तीन जागांवर भाजप आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे खाते उघडले आहे. पक्षाने येथे बसीरहाट विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला आहे. राजस्थानमध्ये भाजपला सत्ता असूनही चांगले प्रदर्शन करता आलेले नाही.
राजस्थानमध्ये काँग्रेस वरचढ
राजस्थानमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या चार जागांपैकी नसीराबाज, वैर आणि सुरजगड या तीन ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तर भाजपला राज्यात सत्ता असताना फक्त कोटा दक्षिण मतदारसंघ
आपल्याकडे ठेवण्यात यश आले आहे.
लव्ह जिहाद मुद्दा गाजला
लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशमध्ये मोदी लाटेचा परिणाम सर्वाधिक जाणवला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने मोदींचे निकटवर्तीय आणि सध्याचे पक्षाचे अध्यक्ष
अमित शहा यांना राज्याचे प्रचारप्रमुख नेमले होते. यावेळी 11 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाचे फायर ब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविली होती. त्यांनी प्रचाराच्या सुरवातीपासून लव्ह जिहादचा मुद्या उपस्थित करुन मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला होता.
पूर्वेतिहास
लोकसभेच्या तीन जागांमध्ये गुजरातमधील बडोदा, उत्तर प्रदेशातील मैनपुरी आणि तेलंगणामधील मेढक येथील जागेसाठी पोटनिवडणूक झाली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचे प्रतिनिधीत्व कायम ठेवत बडोद्याच्या खासदरकीचा राजीनामा दिला होता. मैनपुरीच्या खासदारपदाचा समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी राजीनामा दिल्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली होती. तर, विधानसभेच्या जागांसाठी उत्तर प्रदेशच्या 11, गुजरातमधील नऊ, पश्चिम बंगालमध्ये दोन आणि पूर्वोत्तर राज्यांमधील पाच जागांशिवाय छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. यातील विधानसभेच्या 24 जागा भाजपकडे होत्या, तर प्रत्येकी एक जागा त्यांचे सहकारी पक्ष तेलगू देसम आणि अपना दल यांच्याकडे होती.
उत्तर प्रदेशातील निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा (छायाचित्र - बडोदा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नरेंद्र रावत यांनी 13 सप्टेंबर रोजी मतदानानंतर पक्षाचे निवडणूक चिन्ह दाखवत सेल्फी घेतली होती. )
पुढील स्लाइडमध्ये, नऊ विधानसभांची ताजी स्थिती