आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bypoll Results Analysis, Divya Marathi, 15 September

विश्लेषण : पोटनिवडणुकांत जनतेने मोदींना वाढदिवसाचे गिफ्ट नाकारले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्या निमित्ताने पोटनिवडणुकीतील विजयाच्या रुपाने आपल्या नेत्याला भेट देण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न सपशेल फसला आहे. नऊ राज्यांमधील विधानसभेच्या 33 आणि लोकसभेच्या 3 जागांचा निकाल मंगळवारी समोर आला. यात लोकसभेच्या जागांवर जैसे थे परिस्थिती असली तरी पोट निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याची परिस्थिती आहे. पुढील महिन्यात होणा-या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्याच दृष्टीकोनातून या निकालाचे विश्लेषण केल्यास भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसला तो उत्तर प्रदेशात. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयात सर्वाधिक भागीदारी देणा-या उत्तरप्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची चांगलीच गच्छंती झालेली पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 11 जागांसाठी पोट निवडणूक झाली. या सर्वच जागा भाजपच्या ताब्यात असणा-या होत्या. पण या ठिकाणी जोरदार मुसंडी मारत मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव या पितापुत्रांनी भाजपला जोरदार धोबीपछाड दिली आहे. सपाने यापैकी तब्बल 8 जागांवर ताबा मिळवला आहे. म्हणजेच भाजपला येथे 8 जागांचे नुकसान झाले आहे.
उत्तरप्रदेश पाठोपाठ गुजरात आणि राजस्थानमध्येही भाजपच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. गुजरातमध्ये नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये सहा जागांवर भाजप तर तीन जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने मिळवलेल्या तिनही जागा या भाजपकडे होत्या. त्याखेचून आणण्यात काँग्रेसचा हात यशस्वी ठरला आहेत. त्याच प्रमाणे राजस्थानातही राजेंनाही मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी तर चारपैकी केवळ एक जागा वाचवण्यात भाजपला यश आले आहे. उर्वरित तीन जागा काँग्रेसने खेचून नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यातल्या त्यात भाजपसाठी काहीशी समाधानकारक बाब म्हणावी ती पश्चिम बंगालमधील एका जागेवर मिळालेला विजय. बसिरहाट दक्षिण जागेवर विजय मिळवत भाजपने तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा ममता बॅनर्जींचे साम्राज्य अशलेल्या पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी पक्षाने 1999 मध्ये एका जागेवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपने तृणमूलबरोबर निवडणूक लढवली होती. तर लोकसभा निवडणुकीत येथे भाजपला दोन जागांवर विजय मिळाला होता.

एकूणच सर्व राज्यांची परिस्थिती पाहता पोटनिवडणूक झालेल्या 33 पैकी 26 जागा या भाजपच्या ताब्यात असणा-या होत्या. त्यापैकी भाजपला 13 जागांचा फटका बसलेला दिसून येत आहे. म्हणजे तब्बल 50 टक्के नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. एकूण काय तर, भाजपला फायदा होणे दूरच पण त्यांच्या ताब्यातील जागाही टिकवता आलेल्या नाही. त्यामुळे मोदी लाट ओसरली असल्याचा विरोधकांचा दावा खराच आहे की काय, अशी शंका भाजप कार्यकर्त्यांनाही त्रस्त करू शकते. त्यात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडच्या निवडणुकीवर सगळ्या देशाचे लक्ष लागलेले असाताना आलेले अशा प्रकारचे निर्णय या राज्यांमध्ये काँग्रेस आणि तर पक्षांचे मनोबल उंचावण्याचे काम करेल का हेही प्रचाराच्या रणधुमाळीत स्पष्ट होइलच. त्यामुळे आता नजरा सगळ्यांच्या नजरा या राज्यांकडे रोखलेल्या असणार.

पुढील स्लाइड्सवर पाहा या निवडणुकांमधील मुद्दे व इतर विश्लेषण