आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर पोटनिवडणुकीत 200 मतदान केंद्रांवर हल्ला; पेट्रोल बॉम्बचा मारा, कारवाईत 6 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- दहशतवादी आणि फुटिरतावाद्यांच्या बहिष्कारामुळे रविवारी श्रीनगर-बडगाम मतदारासंघाच्या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बडगाममध्ये आंदोलकांनी २०० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर हल्ला चढवला. त्यांनी पेट्रोल बॉम्बचा वर्षावही केला. 

दरम्यान, सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ६ आंदोलक ठार झाले. तर, सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे १०० हून अधिक लोक जखमी झाले. लोकांनी मतदानासाठी घराबाहेर पडू नये, असा इशाराच दहशतवाद्यांनी देऊन टाकल्यामुळे या भागातील दीड हजार मतदान केंद्रांवर फक्त ६.५ टक्केच मतदान झाले. या मतदारसंघात १२.६० लाख एकूण मतदार असून फक्त ८० हजार लोकांनीच मतदानाचा हक्क बजावला. श्रीनगरच्या ३० वर्षांच्या इतिहासातील हा आजवरचा निचांक आहे. 

माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यासह नऊ उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. हिंसाचाराच्या भीतीने बडगाम जिल्ह्यातील ७० टक्के मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. या भागात १४ मतदान यंत्रेही फोडण्यात आली. दरम्यान, फुटिरतावाद्यांनी सोमवारपासून दोन दिवसांच्या बंदचे आवाहन केले आहे. काश्मीर विद्यापीठानेही होऊ घातलेल्या सर्व परीक्षा १२ एप्रिलपर्यंत रद्द करून टाकल्या आहेत. 

सुरक्षा दलांकडे नव्हत्या पॅलेट गन, म्हणून करावा लागला गोळीबार  
अधिकाऱ्यांच्या मते, मतदान केंद्रांवर तैनात बीएसएफच्या जवानांकडे पॅलेट गन नव्हत्या. त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव गोळीबार करावा लागला. त्यात बीरवाहमधील तीन, दलवानमधील दोन आणि वथूपोरामधील एक जण मारला गेला. फैजान अहमद डार, अकील अहमद वाणी, आदिल फारुख शेख, शबीर अहमद बट तसेच अकिल अहमद वाणी अशी मृतांची नावे आहेत.  

आठ राज्यांमध्येही पोटनिवडणुकांचे मतदान  
श्रीनगरसोबतच ८ राज्यांतील १० विधानसभा जागांसाठीही रविवारी पोटनिवडणूक पार पडली. मतमोजणी १३ एप्रिलला होईल. आसामधील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भाेरंज, मध्य प्रदेशातील अटेर, बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांठी, दिल्लीतील राजौरी गार्डन, राजस्थानचे धौलपूर, कर्नाटकमधील नंजनगड, झारखंडचा लिट्टीपाडाचा त्यात समावेश  आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...