(फाइल फोटो: पंतप्रधान नरेंद्र मोदी)
नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (9 नोव्हेंबर) दुपारी एक वाजता होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला विस्तार आहे. मंत्रिमंडळात सद्यस्थितीत 23 केंद्रीय मंत्री आणि 22 राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्र्यामध्ये 10 मंत्र्यांकडे स्वतंत्र कार्यभार आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रिपदी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गोव्याचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज सायंकाळी चार वाजता शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी 9 मंत्र्यांसह पार्सेकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोव्याचे आरोग्यमंत्री होते. फ्रान्सिस डिसुझा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली. तर, त्यांच्याबरोबरच रामकृष्ण ऊर्फ सुधीर ढवळीकर, दयानंद मांजरेकर, रमेश दौडकर, महादेव नाईक, दिलीप परूळेकर, मिलिंद नाईक, पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर आणि श्रीमती अलिना सौदानिया या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली.
केंद्रात भाजपच्या अनेक नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोहर पर्रिकर यांच्याशिवाय शिवसेना नेते सुरेश प्रभु यांना मंत्रिमंडळात सहभागी केले जाऊ शकते. जी-20 परिषदेत सुरेश प्रभु यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचबरोबर वाजपेयी सरकारच्या काळात ते मंत्री होते.
भाजपचे महासचिव जे.पी.नड्डा यांनाही संधी दिली जाणार आहे. नड्डा हे महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रभारी होते. तसेच मुख्तार अब्बास नकवी यांचे नावही चर्चेत आहे. भाजपमधील नकवी हे अल्पसंख्यक चेहरा असून वाजपेयी सरकारच्या काळात मंत्री होते.