आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलनंतर साखरेचा गोडवा लवकरच तुमचे तोंड कडू करण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणेच्या नावाखाली केंद्र सरकारने गुरुवारी साखर क्षेत्रावरील आपले नियंत्रण ‘काही प्रमाणात’ काढून घेतले आहे. परिणामी साखरेचे दर महागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी याबाबत निर्णय घेतला.
साखर नियंत्रणमुक्त करताना सरकारने काही अटीही मांडल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. सरकारच्या निर्णयामुळे साखरेचा कोटा जारी करणे आणि त्याच्यावरील लेव्हीची पद्धत संपुष्टात येईल. आतापर्यंत साखर क्षेत्रात उत्पादनापासून ते वितरणावरील सरकारचे नियंत्रण होते.
साखर जारी करण्यासोबतच खुल्या बाजारात साखरेच्या विक्रीचा कोटाही केंद्र सरकारकडूनच ठरवला जात होता. याशिवाय उत्पादनाच्या 10 टक्के वाटा रेशन दुकानांना लेव्हीच्या स्वरूपात देण्याचे बंधन साखर कारखान्यांवर होते. आजच्या निर्णयानंतर ही पद्धत संपुष्टात येणार आहे. यामुळे साखर क्षेत्रात 3 हजार कोटी रुपये येणार आहेत.
साखर का महागणार
सरकार आतापर्यंत कारखान्यांकडून साखर 20 रुपये किलो दराने विकत घेत होते. आता ही खरेदी बाजारभावाने होईल. सार्वजनिक वितरण यंत्रणेत (पीडीएस) सरकार साखर 13.50 रुपये भावाने विकते. यामुळे सरकारवरील सबसिडीचा बोजा 2600 वरून 5300 कोटी रुपयांवर जाईल. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याची शक्यता आहे. यामुळे साखर आणखीच महाग होईल.
दरवाढ होणार नाही : अन्नमंत्री थॉमस
अन्नमंत्री के.व्ही. थॉमस यांनी मात्र सरकारच्या निर्णयामुळे साखरेचे किरकोळ दर महागणार नसल्याचे म्हटले आहे. खुल्या बाजारात रेशन दुकांनावर पूर्वीसारखीच सवलतीच्या दरात साखर विक्री सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.