आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुश्री खुल्लर यांच्या नावाची कॅगसाठी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ‘सीएजी’ पदासाठी सिंधुश्री खुल्लर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विद्यामान सीएजी विनोद राय यांचा कार्यकाळ 22 मे 2013 रोजी पूर्ण होतो आहे. त्यानंतर सिंधुश्री खुल्लर यांची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास, त्या देशाच्या पहिल्या महिला सीएजी ठरतील.

2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या वेळी काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्या सहकारी आणि त्या वेळी क्रीडा सचिव पदावर कार्यरत खुल्लर यांच्याकडे सध्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी थेट लाभ हस्तांतरण ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ योजनेवर नियंत्रणाची जबाबदारी आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे आरोप खुल्लर यांच्यावरही झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापित शुंगलू समितीच्या अहवालात तसेच सीएजीच्या अहवालातही खुल्लर यांचे नाव होते.

2 जी घोटाळ्यातही त्यांचे नाव आले आणि या घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या संयुक्त संसदीय समिती ‘जेपीसी’समोर खुल्लर यांना हजर व्हावे लागले होते. खुल्लर यांची चौकशी सुरू असताना, काँग्रेसचे सदस्य शशी थरूर मात्र त्यांचा बचाव करत असल्याच्या कारणावरून डाव्या पक्षाचे नेते गुरुदास दासगुप्ता यांनी जेपीसीच्या एका बैठकीतून सभात्यागही केला होता. या स्पेक्ट्रमचे वाटप झाले, त्या कार्यकाळात खुल्लर या अतिरिक्त अर्थसचिव म्हणून कार्यरत होत्या.

नियुक्तीची फाइल पंतप्रधानांकडे
खुल्लर यांच्या नियुक्तीच्या कागदपत्रांवर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग या आठवड्यात शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. खुल्लर यांच्या नियुक्तीची अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही, मात्र राजकीय वतरुळात याबाबतच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यमान सीएजी विनोद राय यांच्यासारख्या सडेतोड व्यक्तीची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्याच्या स्थितीत केंद्र सरकार सध्या नसल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत खुल्लर यांची नियुक्ती केंद्र सरकारसाठी सोयीची असली तरी, यामुळे सीएजीचे अवमूल्यन होईल, अशी चर्चा आहे.

कारकीर्द वादग्रस्त
सिंधुश्री खुल्लर यांची याआधीची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्या क्रीडा सचिव पदावर कार्यरत होत्या तेव्हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले आणि त्यात मोठा घोटाळा झाला. तर खुल्लर अर्थखात्याच्या अतिरिक्त सचिव असताना टू जी स्पेक्ट्रम प्रकरण घडले. याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी जेपीसीसमोर हजरही व्हावे लागले आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे खुल्लर यांची नियुक्ती वादात सापडू शकते.