आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SIT Likely To Reinvestigate 1984 Anti Sikh Riots Cases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शीखविरोधी दंगलींची नव्याने चौकशी होणार, केंद्रीय समितीची शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत तीस वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगलींची नव्याने चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यासंबंधी नियुक्त केलेल्या समितीने विशेष तपास पथक नेमून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. दरम्यान, काँग्रेसने समितीच्या या शिफारशी म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टाकलेला डाव असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती जी. पी. माथूर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या विशेष समितीने गेल्या आठवड्यात गृहमंत्री राजनाथसिंह यांना अहवाल सादर केला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची शिफारस या अहवालात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने २३ डिसेंबर २०१४ रोजी न्या. माथूर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष समिती नेमली होती. यात शीखविरोधी दंगलींची नव्याने चौकशी करण्यासंबंधीची शक्यता पडताळण्यास सांगण्यात आले होते.

भाजपकडून होती मागणी :
भाजपनेही गेल्या कित्येक दिवसांपासून शीखविरोधी दंगलीची नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. यापूर्वी नानावटी आयोगाने या प्रकरणी दाखल असलेल्या २४१ पैकी केवळ चारच प्रकरणांचा नव्याने तपास करण्याची शिफारस केली होती. मात्र, भाजपने े २३७ प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली.

फक्त एकाच प्रकरणात शिक्षा
आयोगाच्या शिफारशीनुसार सीबीआयने २४१ पैकी केवळ चार प्रकरणांचा तपास केला.यापैकी दोन प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले आणि विशेष म्हणजे एकाच प्रकरणात एका माजी आमदारासह पाच लोकांना दोषी ठरवण्यात आले होते.

ही तर नौटंकी
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानीतील शीख मतदारांना प्रलोभन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाटक रचले आहे. - रणदीपसिंग, काँग्रेस प्रवक्ते.

स्वागतार्ह निर्णय
समितीच्या शिफारशींनुसार लवकरात लवकर विशेष तपास पथक नेमून दंगलींची नव्याने चौकशी करण्यात यावी. हा निर्णय स्वागतार्ह ठरेल. - मंजितसिंग, अकाली दल नेते