आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची उमेदवारी आता ‘आप’च्या धर्तीवर,सर्वेक्षणात मिळालेल्या पसंतीनुसार दिले जाणार तिकीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या धर्तीवर काँग्रेसही आता स्थानिक लोकांच्या पसंतीनुसार निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची निवड करणार आहे. काँग्रेसतर्फे आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीत नवीन लोकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार असून ज्यांचा निवडणुकीत ब-याचदा पराभव झाला आहे, त्यांना येत्या निवडणुकीपासून दूरच ठेवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. शिवाय, लोकसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करणा-या खासदारांना दुस-यांदा निवडणुकीचे तिकीट दिले जाणार नाही. काँग्रेसने चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा धसका घेतला असून पुढील काळातही असाच फटका बसू नये यासाठी विविध उपाययोजना करत आहे. जी नेतेमंडळी जुने मतदारसंघ बदलून नव्या ठिकाणाहून निवडणुकीस उभे राहण्याच्या तयारीत आहेत, त्यांना स्थानिक सर्वेक्षणाच्या पसंतीक्रमात स्थान मिळाल्यासच तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता परिवर्तनाचे नवे वारे वाहायला लागले आहेत.
खासदारही लागले कामाला
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधीच आम आदमी पार्टीकडून काही तरी शिकण्याचा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. याच धर्तीवर पक्षातील वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीसुद्धा जनतेचा कौल लक्षात घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या नेत्यांच्या या वक्तव्यावरून पक्षात सुरू असलेल्या हालचालींचे परिणाम लक्षात घेता येऊ शकतात. यावरून एक गोष्ट निश्चित होते की, काँग्रेस आता लोकसभा निवडणुकीत मात खाल्लेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याच्या पवित्र्यात नाही. पक्षांतर्गत हालचालीच्या अनुषंगानेच खासदार, आमदारही आता कामाला लागले आहेत. वैयक्तिक पातळीवर आपल्या लोकप्रियतेची चाचपणी करण्यासाठी ते सर्वेक्षण करत आहेत. वरिष्ठ कार्यकारिणीने सर्व राज्यांच्या अध्यक्षांना आदेश दिले आहेत की, आपल्या इच्छा लादण्यापेक्षा स्थानिक लोकांची पसंत, उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आदी बाबींचा लेखाजोखा पाठवावा.
राहुल गांधी यांच्या कल्पनेनुरूप उपाययोजना
पक्षाच्या रणनीतीशी संबंधित एका नेत्याने सांगितले की, पक्षाने स्थानिकांच्या मतांना अधिक महत्त्व द्यावे हा राहुल गांधींचा सल्ला अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष मजबुतीसाठी त्यांनी अनेक उपाययोजनाही सुचविल्या आहेत. पक्षातील सर्वचे मोठे नेते अद्यापही जुन्या परंपरावादी राजकारणाच्या मोहातून बाहेर पडले नसल्याचेही या नेत्याने सांगितले आहे.
आधी सर्वेक्षणाची चाचपणी, मग उमेदवारी दिली जाणार
लोकसभा निवडणुकीत विविध राज्यांत उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत पक्षाने आतापर्यंत दोन वेळा सर्वेक्षण केले आहे. महासचिव मधुसूदन मिस्त्री यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीची उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. ताज्या राजकीय घडामोडीनुसार दोन्ही सर्वेक्षणांतून प्राप्त निकालांची सध्या चाचपणी सुरू असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.