नवी दिल्ली - पाकिस्तानी तुरुंगात कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात १३ सप्टेंबरपर्यंत आपला जबाब नोंदवण्याची तसेच दस्ताऐवज जमा करण्याची मुभा आंतराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताला दिली आहे. पाकिस्तानने भारताच्या जबाबास १३ डिसेंबरपर्यंत प्रत्युत्तर द्यावे असेही आयसीजेने स्पष्ट केले आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातही पाकिस्तानकडून उलट्या बोंबा सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणात जबाबासाठी अतिरिक्त वेळेच्या मागणीचा भारताचा प्रस्ताव फेटाळून लावल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताने डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेले कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, भारताने हेरगिरीचे आरोप फेटाळून लावत आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती.