(फाइल फोटो : सीबीआईचे संचालक रंजीत सिन्हा)
नवी दिल्ली - सीबीआयचे डायरेक्टर रंजीत सिन्हा यांच्या रिलायन्सच्या अधिका-यांबरोबर भेटीचा मुद्दा मंगळवारी सुप्रीम कोर्टात पोहोचला. याचिका दाखल करणा-या संघटनेने सिन्हा यांच्या निवासस्थानातील एंट्री रजिस्टरमधील माहिती आश्चर्यकारक असल्याचा दावा केला आहे.
सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन (सीपीआयएल) ने हा मुद्दा उचलून धरला आहे. ज्या याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर टू जी स्पेक्ट्रमचे 122 परवाने रद्द झाले होते, त्याच याचिकाकर्त्यांपैकी एक ही संस्था आहे. जस्टीस एच.एल. दत्तू, एस.ए. बोबडे आणि ए.एम. सप्रे यांच्या पीठाने सीबीआयच्या संचालकांच्या याचिकेवर सुनावणी केली.
यासंदर्भात सीबीआय, सीबीआय संचालक आणि कोर्टाला आवश्यक ती माहती आणि कागदपत्रे देण्याचे निर्देश पीठाने सीपीआयएलला दिले आहेत. यावर गुरुवारी सुनावणी करणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. यापूर्वी याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी सीबीआय संचालक चौकशीत अडथळे आणत असल्याचा आरोप केला होता.
प्रकरण काय ?
अनिल अंबानी यांच्या कंपनीचे दोन अधिकारी सोमवारी सिन्हा यांना भेटले होते, असा दावा एका बातमीमध्ये करण्यात आला होता. गेल्या 15 महिन्यांमध्ये ते 50 वेळा भेटले. सिन्हा यांच्या घराच्या व्हिजिटर्स डायरीमध्ये या अधिका-यांची नावे आहेत. या अधिका-यांच्या गाड्याही अनिल अंबानी समुहाच्या नावावर आहेत.
व्हिजिटर्स डायरीमध्ये माहिती नाही - सीबीआई
दरम्यान, सीबीआयचे प्रवक्ते कंचन प्रसाद यांनी या सर्व बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. सीबीआयच्या संचालकांच्या निवासस्थानी असणा-या व्हिजिटर्स डायरीमध्ये अशी कोणतीही माहिती नसल्याचेही ते म्हणाले आहेत.