आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI File Charge Against Maharashtra Bank's Aurangabad Assistant General Maneger

औरंगाबादच्या महाराष्ट्र बँकेच्या सहायक महाव्यवस्थापकाविरुद्ध सीबीआयचे गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद - मालमत्तेचे मूल्य वाढवलेले दाखवून कर्ज देत एकूण ५५ कोटींचे नुकसान केल्याप्रकरणी औरंगाबादेतील महाराष्ट्र बँकेच्या सहायक महाव्यवस्थापकाविरुद्ध सीबीआयने दोन प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या प्रकरणात, तत्कालीन एजीएम ए.एम. राजे, औरंगाबादस्थित व्यापारी प्रतिष्ठाणचे प्रोप्रायटर्स व भागीदार तसेच बँकेचे दोन मूल्य निर्धारकांविरुद्ध कथितरित्या ४२.३८ कोटी रुपयांच्या नुकसानीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दुस-या प्रकरणात, १३.५५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी राजे यांच्यासह औरंगाबादस्थित खासगी फर्मचे चार प्रोप्रायटर्स-भागीदार व एका मूल्य निर्धारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद झोनमधील महाराष्ट्र बँकेच्या सहायक महाव्यवस्थापकांनी २०१२-१३ मध्ये आरोपींसोबत संगनमत करून मालमत्तेच्या बदल्यात कर्ज योजनेअंतर्गत बँकेकडून प्रत्येक कर्जदाराला प्रत्येकी सुमारे पाच कोटी रुपयांचे कर्ज दिले. मूल्य निर्धारकांनी त्यांच्या मालमत्तेचे मूल्य वाढवलेले दाखवून तशी प्रमाणपत्रे दिली. ती प्रमाणपत्रे राजे यांनी मंजूर करवून घेत कर्जदारांना कर्ज दिले होते. कर्जदारांनी मिळालेल्या कर्जाचा गैरवापर करून त्याची परतफेडही केली नसल्याचा आरोप सीबीआय प्रवक्त्यांनी केला.

पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांत सलीम अहमद खान, खान रमीज राजा व शहाना परवीन, शेख जफर शेख निझाम, इनायत जफर अली खान, शेख इरफान शेख रहीम कासीम, ए.सय्यद ए. नजीर, शेख मोईनुद्दीन शेख अमिनुद्दीन या औरंगाबादच्या व्यावसायिकांचा समावेश आहे.

त्याशिवाय ऐजाज अहमद खान, शेख मोहंमद सबी, मुजाहिद खान, अजमतुल्ला खान, फय्याज अहमद खान, कुतुबुद्दीन सय्यद साबीर, पॅनल व्हॅल्युअर्स मिलिंद सांगवीकर, सागर डी. गोजे यांचाही समावेश आहे. दुस-या प्रकरणातील आरोपींत राजे यांच्यासह सविता मुरकुटे, दीपक मुरकुटे, शेख सादीक इस्माइल, त्र्यंबक मुरकुटे व महाराष्ट्र बँकेचे पॅनल व्हॅल्युअर जे.एस. चांडोक यांची नावे आहेत.