आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टांची माहिती देण्यास सीबीआयचा नकार, सीआयसीच्या आदेशाला देणार आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे उघडकीस आणणारी देशाची सर्वोच्च तपास संस्था सीबीआय त्यांच्या खात्यातील भ्रष्ट अधिकार्‍यांची माहिती आरटीआयअंतर्गत देण्यास मात्र फारशी उत्सुक नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सीबीआय अधिकार्‍यांचा तपशील सार्वजनिक करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाला (सीआयसी) दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे.
सीबीआयचे अधिकारी विवेक दत्त आणि राजेश कर्नाटक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याबाबत आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी माहिती अधिकारांत अर्ज केला होता. त्यात त्यांनी त्यांच्यावरील आरोपांची माहिती मागितली होती. कोळसा खाण घोटाळ्याच्या तपासात हे अधिकारी सहभागी होते. त्यांनी त्यांच्या प्रभावाचा वापर करून एका उद्योजकाला फायदा करून देणे आणि त्या बदल्यात लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबाबत आरटीआयअंतर्गत माहिती देण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने सीआयसीने सीबीआयला दिले होते. परंतु आता सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी ए. बोथरा यांनी अग्रवाल यांच्या अर्जाला उत्तर देताना सीआयसीच्या आदेशाच्या विरोधात सीबीआय दिल्ली उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे स्पष्ट केले.

उल्लेखनीय म्हणजे तत्कालीन यूपीए सरकारने केंद्रीय तपास एजन्सीला आरटीआय कायद्यातून सवलत दिली होती. सीबीआयला माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24 अन्वये तरतुदींमधून बाहेर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यात असे स्पष्ट करण्यात आले होते की, जेव्हा अर्जदाराने मागितलेली माहिती एखाद्या सरकारी प्राधिकार्‍याकडे उपलब्ध असेल आणि ती भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तर मात्र, ती सीबीआयला अर्जदारास द्यावी लागणार होती. मात्र, आता सीबीआय त्यास तयार नाही.