आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI News In Marathi, Company, Import, Divya Marathi

कंपन्यांचा आयात ‘उद्योग’ सीबीआय खणून काढणार, महसूल संचालनालयाकडून माहिती मागवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील अनेक कंपन्यांनी आयातीच्या नावाखाली जोरदार कर्जाची उचल केली आहे. त्याचा फटका बँकिंग क्षेत्राला बसला आहे. कंपन्यांच्या ‘उद्योगां’ची मुळे खणून काढण्यात येणार आहेत. सीबीआयने त्यासाठी महसूल गुप्तहेर संचालनालयाकडून (डीआरआय) माहिती मागवली आहे.

सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी बँकिंग आणि महसूल विभागाच्या सचिवांना परदेशातील आयात व्यवहारांचा तपशील देण्यास सांगितले आहे. त्यामध्ये देशातील अनेक उद्योग समूहांचा समावेश असल्याचा दावा तपास संस्थेकडून करण्यात आला आहे. आयातीसंबंधी करण्यात येणारा हा व्यवहार बेकायदा स्वरूपाचा असून तो बिनबोभाटपणे सुरू असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. हा व्यवहार करताना कायद्याला धाब्यावर बसवतानाच आयात करालाही चाट लावण्याचे काम केले जात असल्याचे तपास अधिका-यांचे म्हणणे आहे. सीबीआयने आयातीअंतर्गत गैरव्यवहार करणा-या कंपन्यांची नावे मात्र जाहीर केलेली नाहीत. महसूल विभागाचे सचिव एस. के. दास यांना पाठवलेल्या पत्रात हा धक्कादायक प्रकार नमूद करण्यात आलेला आहे.

पायाभूत क्षेत्र : पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचा आयात शुल्क भरलेला नाही. अनेक उद्योग समूहांनी आयात शुल्क भरावा लागू नये, यासाठी कायद्यातील पळवाटा शोधल्याचे दिसून येते.

मोडस ऑपरेंडी
आयातीसाठी कंपनी परदेशातील कंपनीसोबत करार करते. त्यांच्यात व्यवहार केला जातो. व्यवहारातील बिलाचा आकडा मात्र प्रचंड फुगवून सांगितला जातो. वास्तविक, निर्यातदार संस्थेचा उत्पादन दर कमी असल्याचे तपासात आढळून आले आहे. बिलाचा आकडा अधिक असल्याचे दाखवून बँकांतून कर्ज काढले जाते. यातील फरकाची रक्कम उद्योग समूह आपल्या खिशात घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.