आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Officers Could Not Understand DoT Files, A Raja Tells Court

CBI ला फायलीच समजल्या नाहीत -ए. राजा, माजी दूरसंचारमंत्र्यांचा कोर्टात अजब दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टूजी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी गेले १५ महिने माझी चौकशी केली. मात्र चौकशी अधिकाऱ्यांना दूरसंचार विभागाच्या फायलीच समजल्या नाहीत. त्यामुळे माझ्यावर खटला दाखल झाला आहे, असा दावा या घोटाळ्यातील आरोपी माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात केला.
टूजी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणात मंगळवारी अंतिम युक्तिवाद झाला. विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्यासमोर आपली बाजू मांडताना ए. राजा म्हणाले की, मी गेल्या १५ महिन्यांपासून सीबीआयच्या चौकशी अधिकाऱ्यांना दूरसंचार मंत्रालयाच्या फायलींची माहिती देत आहे. माझी चौकशी झाली, मी प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टीकरणही दिले, पण अधिकाऱ्यांना या फायलीच समजत नाहीत. त्यामुळे माझ्यावर खटला चालवला जात आहे.

राजा यांचे वकील मनीष शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असे संबोधले जात असलेल्या या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली, पण दूरसंचार मंत्रालयाच्या नियोजन आणि समन्वय शाखेतून टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (टीटीएसएल) आणि टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड यांचे अर्ज कसे हरवले याचा तपास सीबीआयने केला नाही. तपास असा कसा केला जात आहे? या फायली बेपत्ता कशा झाल्या याची जबाबदारी सीबीआय का निश्चित करत नाही? या स्थितीचा वापर साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे.

या प्रकरणात राजा यांच्याव्यतिरिक्त द्रमुकच्या खासदार कनिमोई, माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहरा आणि तीन कंपन्यांसह १४ जणांवर खटला सुरू आहे. दरम्यान, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना फाइल समजत नाहीत, असा अजब आरोप अद्याप कोणत्याही प्रकरणात झाला नव्हता. तो टूजी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात झाला आहे. राजा यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे, हे एवढ्यात स्पष्ट होऊ शकणार नाही; परंतु सीबीआयच्या इतिहासात या यंत्रणेवर अशा प्रकारचा आरोप झालेला नसावा.