नवी दिल्ली - बहुचर्चित टाट्रा ट्रक लाचखोरी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, पंतप्रधानांचे सल्लागार टी.के. ए. नायर यांचे जबाब नोंदवले. भारतीय लष्करासाठी टाट्रा ट्रक खरेदी करण्यासाठी एका निवृत्त वरिष्ठ अधिकार्याने आपणाला कोट्यवधी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी केला आहे. त्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत (सीबीआय) या प्रकरणाची दोन वर्षांपासून चौकशी करत आहे. प्रकरण बंद करावयाचे की आरोपपत्र दाखल करावयाचे, याचा निर्णय घेण्यासाठी सीबीआयने अँटनी आणि नायर यांचा जबाब नोंदवण्याचे ठरवले आहे. ए.के.अँटनी आणि पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी सांगितले.
निवृत्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांनी 1600 टाट्रा ट्रक खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी 14 कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप सिंह यांनी केला होता. तेजिंदर यांनी आरोप फेटाळले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बीईएमएल कंपनी ट्रक पुरवणार होती. अँटनी यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर ऑक्टोबर 2012 मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
तेजिंदर सिंग यांनी लाचेचा प्रस्ताव ठेवल्यानंतर 22 सप्टेंबर 2010 रोजी अँटनी यांना याबाबतची माहिती देण्यात आल्याचे सिंह यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नायर यांनी टाट्रा करार रद्द करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. जनरल सिंह यांनी त्यांचे तेजिंदरसोबतचे संभाषण ध्वनिमुद्रित केले होते. मात्र, त्यात केवळ गोंगाट ऐकू येत असल्यामुळे ध्वनिफितीचा उपयोग झाला नाही. जनरल सिंह यांनी सीबीआयकडे ध्वनिफीत जमा केली आहे. फोरेन्सिक तज्ज्ञांना कॅसेटमधील संभाषण ओळखण्यात अपयश आले आहे.