आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई/नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) गुरुवारी कर चोरी प्रकरणात द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांच्या चेन्नई येथील घरावर धाड टाकली. सीबीआयची ही कारवाई द्रमुकने दोन दिवसांपूर्वी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतलेल्या घटनेशी जोडली जात आहे.सकाळी सीबीआयचे पथक स्टॅलिन यांच्या घरी धडकताच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. विविध राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवला असून सरकार सारवासारव करण्याच्या प्रयत्नात आहे.
सीबीआयच्या कारवाईची वेळ दुर्दैवी आहे, असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे. द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन यांच्याविरुद्ध सीबीआयने केलेली कारवाई राजकीय बदला घेण्याच्या भावनेतून झाली आहे, अशी प्रतिक्रिया द्रमुकने दिली आहे. सीबीआय कारवाईची कोणतीही कल्पना नव्हती, असे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही राजकीय नेत्याला लक्ष्य करण्याचा आमचा हेतू नाही. कारवाई कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. भाजप नेते वेंकय्या नायडू यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला.
17 विदेशी कार जप्त- सीबीआयने 33 वाहनांच्या आयातीत करचोरी केल्याप्रकरणी खटला दाखल केला आहे. यासंदर्भात त्यांनी स्टॅलिन व त्यांचा मित्र राजा शंकर यांच्या निवासस्थानासह 19 ठिकाणांवर धाडी टाकल्या. यादरम्यान 17 परदेशी कार जप्त करण्यात आल्या. कार आयात केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करून त्या विकण्यात आल्याचा सीबीआयचा आरोप आहे. यामुळे सरकारचे जवळपास 48 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन- सीबीआयची कारवाई यूपीएला पाठिंबा देणार्या पक्षांसाठी स्पष्ट संकेत असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (माकपा) नेते सीताराम येचुरी यांनी दिली आहे. पाठिंबा काढून घेतल्यानंतर 24 तासांत ही कारवाई झाल्याने सीबीआय ही कॉँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
करुणानिधींचे तळ्यात-मळ्यात - द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांनी द्रमुकवर राजकीय द्वेषभावनेतून कारवाई होत राहिल्याचे सांगितले आहे. द्रमुकबाबत राजकीय कारवाया या आधी झाल्या आहेत. त्यामध्ये या कारवाईचा समावेश असू किंवा नसू शकतो, असे सांगत करुणानिधी यांनी तळ्यात-मळ्यात भूमिका स्विकारली. केंद्र सरकारला कारवाईची कल्पना नव्हती, असे केंद्रीय मंत्री म्हणत असतील तर त्यांच्यावर विश्वास नाही, असे मी म्हणणार नाही.
पंतप्रधान नाराज का आहेत?- भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी सीबीआयच्या धाडीबद्दल पंतप्रधान नाराज का आहेत, असा सवाल केला. सीबीआयच्या कामात हा हस्तक्षेप आहे. सरकारचा घटक पक्ष पाठिंबा काढतो आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या घरावर धाड पडते. सरकार राजकीय परिणामांचा विचार करून धाडसत्र थांबवते. हा पण सीबीआयच्या कामात हस्तक्षेप व दुरुपयोग आहे. पंतप्रधान असो अथवा अर्थमंत्री, त्यांना सीबीआयच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. - अरुण जेटली, ज्येष्ठ भाजप नेते
- या कारवाईतून गैरसमज निर्माण झाला आहे. यासंदर्भात माझे मत संबंधित मंत्री व्ही. नारायणसामी यांना सांगितले आहे. -पी. चिदंबरम, अर्थमंत्री
- स्टॅलिन विरोधातील कारवाई आम्हाला मान्य नाही. कमलनाथ
- स्टॅलिन यांच्या घरावरील धाड सीबीआयचा गैरवापर कसा केला जात आहे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यूपीएमधून बाहेर पडाल तर सीबीआयचा वापर करू, हे यूपीएने दाखवून दिले आहे. -भाजप
- या कारवाईबद्दल आम्ही चिंतित आहोत. सरकारचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. या कारवाईची आम्ही माहिती घेऊ. धाड टाकण्याची वेळ दुर्दैवी आहे. मनमोहनसिंग, पंतप्रधान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.