आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Submit Charge Sheet, Pawankumar Bansal Get Concession

रेल्वे लाचखोरी प्रकरण: सीबीआयचे आरोपपत्र दाखल, पवनकुमार बन्सल यांना तात्पुरता दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुमारे 10 कोटी रुपयांच्या रेल्वे लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मंगळवारी नवी दिल्लीच्या पतियाळा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात रेल्वे मंडळाचे निलंबित सदस्य महेशकुमार तसेच माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंगला यो दोघांसह एकूण 10 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पवनकुमार बन्सल मात्र आरोपींमध्ये समावेश होण्यापासून बचावले आहेत.


सीबीआयने या संदर्भात बन्सल यांची अनेकवेळा चौकशी केली होती. मात्र त्यानंतरही त्यांचे नाव आरोपींमध्ये नाही. यासंदर्भात विचारले असता, पवनकुमार बन्सल यांचा या लाचखोरी प्रकरणात सहभाग असल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत मिळाला नसल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. बन्सल यांच्याविरोधात ठोस पुरावा मिळाला, तर त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येईल असे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले. महेशकुमार यांच्याकडून 10 कोटी रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर व त्यात बन्सल यांचा भाचा विजय सिंगला याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर बन्सल यांना रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होेते. या आरोपपत्रात आरोप निश्चित करण्यात आलेल्या 10 पैकी 8 लोक सध्या तुरुंगात आहेत. ज्या कुरियर बॉयने लाचेची ही रक्कम पोहोचवली, त्याच्यावर आरोप दाखल केला नसल्याचे, सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. सिंगला तसेच महेशकुमार यांच्यातील संभाषणाचे 1 हजाराहून अधिक फोन कॉल टॅप केल्याचे तसेच या सर्वाविरोधात अनेक ठोस पुरावे हाती लागल्याचा दावा सीबीआयने केला आहे.


आरोपपत्रातील नावे
विजय सिंगला, महेशकुमार, दलाल संदीप गोयल, समीर संधीर, सुशील डागा, अजय गर्ग, राहुल यादव, व्यावसायिक मंजूनाथ, त्याचे दोन सहकारी पी.व्ही.मुरली आणि वेणुगोपाल. या पैकी मुरली तसेच वेणुगोपाल वगळता इतर तुरुंगात आहेत.


शेवटच्या दिवशी आरोपपत्र
अटक केल्यानंतर 60 दिवसांच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे, असा नियम आहे. तसे न झाल्यास आरोपींना जामीन दिला जातो. या प्रकरणात 3 मे रोजी गुन्हा दाखल करून दुस-या दिवशी विजय सिंगला, महेशकुमार आणि इतर दलालांना अटक करण्यात आली होती. त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्याच्या मुदतीचा मंगळवार, 2 जुलै हा शेवटचा दिवस होता. मंगळवारी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले नसते, तर या सर्वांना जामीन मंजूर झाला असता.


कोणाची भूमिका काय
1) दलाल संदीप गोयल याने महेशकुमार यास रेल्वे मंडळावर सदस्य (इलेक्ट्रिकल) म्हणून घेण्याची खात्री देत त्या बदल्यात 10 कोटी रुपये मागितले.
2) गोयलने या संदर्भात विजय सिंगला व अजय गर्ग यांच्याशी संपर्क साधला. महेशकुमार यांना मंडळाचे सदस्य करण्यात आले. मात्र, महेशकुमारने पश्चिम रेल्वेच्या सिग्नल ब टेलीकॉम यंत्रणेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची इच्छा व्यक्त केली. गोयलने त्यासाठी आणखी 2 कोटी रुपये मागितले.
3) महेशकुमारने रेल्वेचा कंत्राटदार मंजूनाथ व इतर व्यावसायिकांना रक्कम देण्यास सांगितले. त्याबदल्यात कंत्राटे देण्याचे कबूल केले.
4) मंजूनाथने दोन कोटींऐवजी फक्त 90 लाख रुपयांची व्यवस्था केली. कुरियर बॉयमार्फत ही रक्कम पोहोचवली जात असतानाच सीबीआयने धाड घालून प्रकरण उजेडात आणले.