आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Center To Control Trinmool Congress Over Security Law And Order Issue In West Bengal

सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार तृणमूल काँग्रेसला रोखणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री अमित मित्रा यांच्याविरोधात एसएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने ममता या बैठकीमध्ये आंदोलकांकडून मित्रा यांचे कपडे फाडण्याचा मुद्दा उपस्थित करू शकतात, असे मानले जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता त्यांना पाठिंबा देणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय आपला बचाव करण्याच्या तयारीत गुंतले आहे. ममता व मित्रा यांच्यासोबत गैरवर्तन करणार्‍या आंदोलकांविरुद्ध जलदगतीने कारवाई करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत.

कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या पोलिस सुधारणेच्या शिफारशीवर बैठकीत चर्चा होणार आहे. यामध्ये अंतर्गत सुरक्षा, एनसीटीसीसह अन्य मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांसमोर संबंधित मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीत पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना अहवाल मागितला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांना ज्या दरवाजातून जाण्याचा सल्ला दिला होता त्या तेथून गेल्या नाहीत. मात्र, गृह मंत्रालयाचे यावर समाधान झाले नाही. त्या दुसर्‍या दरवाजातून गेल्या असल्या तरी त्यांच्या आसपास सुरक्षा जवान असायला हवे होते, जेणेकरून ही घटना ओढवली नसती. एवढेच नव्हे तर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना आरोपींविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालय सोमवारपूर्वी कारवाई करून ममतांचा राग शांत करेल, अशी आशा आहे.

‘धक्काबुक्कीसाठी काँग्रेसची फूस’
ममता व मित्रा यांच्याशी झालेल्या धक्काबुक्कीमागे कॉँग्रेसची फूस कारणीभूत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार सरोज पांडे यांनी ममता बॅनर्जी व मित्रा यांच्याबाबतची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.