नवी दिल्ली - वाढत्या शहरीकरणाची शाश्वत विकास योजनांशी सांगड घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. कार्बन मुक्त रस्त्यांसाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण अशियायी देशांच्या ‘शाश्वत शहरीकरण’ विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दक्षिण अशिया हा जगातील सर्वात कमी शहरीकरण झालेला प्रदेश असून येथील केवळ ३१ टक्के लोकसंख्या शहरी आहे.
पूर्व आशियात ५६ % , लॅटिन अमेरिकेत ८० % तर युरोपात ७३ % शहरीकरण झाले आहे. दक्षिण आशिया या बाबत विकसनशील असून याच टप्प्यावर शहरीकरणाची सांगड पर्यावरणाशी घालण्याची गरज असल्याचे मत नायडू यांनी मांडले. केंद्र सरकारने देशभरात १०० स्मार्ट सिटीज निर्माण करण्याची योजना आखली आहे. ही शहरे अत्याधुनिक व मध्यम आकाराची असतील, असे नायडूंनी सांगितले.