आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Government New Operation Against Naxalism

नक्षलवाद्यांविरोधात केंद्र सरकारचे नवे ऑपरेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - म्यानमारमध्ये जाऊन नक्षलवाद्यांशी यशस्वी लढा दिल्यानंतर आता केंद्र सरकार देशांतर्गंत नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे पाऊल उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. याची सुरुवात छत्तीसगडच्या बस्तर भागातून होणार आहे. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागातून मागील अनेक वर्षांपासून नक्षलवादी विविध कारवाया करत आहेत. त्यांचे येथील अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठीची सुरुवात असून मोहीम सुमारे महिनाभर चालण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी जवानांची निवडही करण्यात आलेली असून सुमारे ६०० जवानांना विशेष कमांडो प्रशिक्षण दिले जात आहे. माओवाद्यांची सर्वांत बलाढ्य बटालियन तसेच दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटीचा कमांडर हिडमा हे या मोहिमेचे लक्ष्य असणार आहेत.

हवाई हल्ल्याचाही पर्याय खुला : नक्षलवाद्यांचा प्रभाव संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने या अभियानासाठी युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. अभियानादरम्यान कोणत्याही क्षणी गरज भासल्यास हवाई हल्ल्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. या दृष्टीने नक्षलवादी प्रकरणांचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार के. विजय कुमार वारंवार राज्याचा दौरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या प्रस्तावित अभियानाचे सूत्रधार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मागच्या महिन्यातच लष्कराने सीमेपार जाऊन क्रूर अतिरेक्यांचा एका कारवाईत खात्मा केला होता. याची समीक्षा आणि देखरेख प्रत्यक्ष सरकारकडून करण्यात आली होती.

आधी सर्च, मग कारवाई
मोहिमेच्या योजनेनुसार, आधी या भागातील नक्षलवाद्यांचे संपूर्ण लोकेशन मिळवले जाईल. त्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कमांडोंना जंगलात उतरवून कारवाई केली जाईल. म्यानमारच्या कारवाईनंतर देशातील एखाद्या नक्षलग्रस्त भागात घेराव घालून हल्ला करण्याची सुरक्षा दलाची ही पहिलीच तयारी मानली जात आहे.

यूएव्ही, ड्रोन उपकरणेही अभियानासाठी वापरणार
म्यानमारच्या कारवाईत सुरक्षा यंत्रणेने अद्ययावत प्रणालीचा वापर केला होता. याच धर्तीवर या देशांतर्गंत मोहिमेसाठीही तयारी केली जात आहे. नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी यूएव्ही आणि ड्रोनचा वापर केला जाणार आहे. कारण, सरकारने या अभियानासाठी हवाई हल्ल्याचाही पर्याय खुला ठेवला आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, अभियानासाठी जवानांची निवड झालेली असून त्यांना विशेष कमांडो प्रशिक्षणासाठी पूर्वोत्तर भागातील लष्करी प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले आहे.