आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Health Minister Going To Launch New System

वैद्यकीय अहवालाचा "पेनड्राइव्ह', फाइलची गरज नाही, नव्या योजनेची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्यक्तीला एखादा आजार जडल्यानंतर त्यावरील उपचारांशी संबंधित कागदपत्रे सांभाळता सांभाळता नाकीनऊ येतात. मात्र, कागदांच्या या जंजाळातून आता लवकरच रुग्णाची सुटका होणार आहे. आरोग्याशी संबंधित सर्व माहिती आता पेनड्राइव्हमध्ये ठेवता येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय एक देशव्यापी योजना आणण्याच्या तयारीत आहे.

ज्या रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू असेल ते रुग्णालय संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देईल. हा प्रस्ताव लागू करण्यासाठी नॅशनल ई -हेल्थ अॅथॉरिटीचीसुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. या प्रस्तावास संसदेत नव्या अधिनियमानुसार कायद्याचा दर्जा मिळेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निकुंज धल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकावर उपचार करून त्यांचा तपासणी अहवाल ठेवणे जिकिरीचे काम असते. या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सरकारने तपासणी अहवाल तसेच उपचाराशी संबंधित अन्य बाबींच्या सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार रुग्णास त्याचे आणि कुटुंबीयांचे सर्व तपशील पेनड्राइव्हमध्ये घेता येतील. ही सेवा सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांत समानरूपाने लागू असेल.

प्रस्तावाचा उद्देश
रुग्णाचा वैद्यकीय अहवाल ही खासगी बाब असते. यासाठी प्रथमच नॅशनल ई हेल्थ अॅथॉरिटीची स्थापना केली जाणार आहे. संसदेत नव्या विधेयकानुसार यास वैधानिक ताकद मिळेल. त्यानंतर कोणतेही रुग्णालय रुग्णाच्या खासगी बाबींमध्ये छेडछाड करू शकणार नाही.