आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central India May Experience Drought: Agriculture Minister

कृषिमंत्र्यांना दुष्काळाची धास्ती, हवामान खाते मात्र आशावादी; दुष्काळग्रस्तांना स्वस्त डिझेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पावसाळ्याचा पहिला महिना कोरडा गेल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पश्चिम भारतावर दुष्काळाचे सावट असल्याचे सांगितले. येथे जूनमध्ये सरासरीपेक्षा 60 ते 90 टक्के पाऊस कमी पडला. 29 पैकी 26 राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. तथापि, देशात दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुणे विभागाच्या उपमहासंचालक मेधा खोले यांनी जुलै-ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो, असे सांगितले.

महाराष्ट्रातील भाजपच्या शिष्टमंडळाला कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी सांगितले की, मंत्रालयाने दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्कालीन योजना आखली आहे. दुष्काळप्रवण 500 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना स्वस्तात डिझेल उपलब्ध करून दिले जाईल. कृषिकर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना व्याजात सवलत दिली जाईल. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पत्रकही तयार केले आहे. इतकेच नव्हे तर दुष्काळामुळे पीक नष्ट झालेल्या शेतकर्‍यांना पर्यायी पिकासाठी मोफत बी-बियाणे दिले जाईल.

कृषिमंत्र्यांना घाई झाली आहे का?
दुष्काळाचे निकष
पावसाळ्यात जेव्हा 26 ते 50% कमी पाऊस पडतो तेव्हा सामान्यपणे दुष्काळ मानला जातो. कमी पर्जन्यमानाचा आकडा 50 टक्क्यांवर असल्यास भीषण दुष्काळ ठरतो.
सध्याची परिस्थिती
जूनअखेरपर्यंत देशात 43 टक्के कमी पाऊस पडला. पावसाळा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. 2009मध्येही जून महिन्यात सरासरीच्या 47 टक्के कमी पाऊस पडला होता.
मग शक्यता का वर्तवली?
पश्चिम व उत्तरेकडील भागांत अद्याप मान्सून पसरलेला नाही. पेरण्याही 35 टक्क्यांनी घटल्या. अनेक भागांत पेयजलाचे स्रोतही आटत आहेत, यामुळे दुष्काळाची शक्यता वर्तवली.
मात्र यामुळे शक्यता वर्तवणे घाईचे ठरेल
जुलैत चांगला पाऊस
जूनमधील कमी पाऊस हे संकट समजू नये. देशाच्या अनेक भागांत मान्सूनचे आगमन होत आहे. याच आठवड्यात मान्सूनला वेग येऊन संपूर्ण जुलैमध्ये चांगला पाऊस होईल.- बी.पी. यादव, संचालक, आयएमडी

पेरण्यांसाठी अजून वेळ
खरिपाच्या पेरण्यांचा हंगाम जूनच्या मध्यापासून ते जुलैपर्यंत चालतो. जुलै व ऑगस्टदरम्यान चांगला पाऊस झाल्यास पेरण्यांत वाढ होऊ शकते. - धर्मकीर्ती जोशी, क्रिसिल
खरा धोका साठेबाजीचा : तज्ज्ञांनुसार आताच दुष्काळाचे चित्र उभे केल्यास साठेबाजी व काळाबाजार वाढू शकतो. शेतकर्‍यांत घबराटीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्र आणि विदर्भासाठी स्वतंत्र आपत्कालीन योजना
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेत त्यांना विदर्भ व राज्यातील संभाव्य दुष्काळाची माहिती देत भरीव मदतीची विनंती केली. पिण्याचे पाणी व चाराटंचाईचा मुकाबला करण्यासाठी विदर्भासारख्या दुष्काळप्रवण क्षेत्रांसाठी स्वतंत्र आपत्कालीन योजना आखली जात असल्याचेही कृषिमंत्री म्हणाले.
जालन्यात अतिरिक्त कृषी विज्ञान केंद्र
- सध्या प्रत्येक जिल्ह्यात केवळ एकच कृषी विज्ञान केंद्र आहे मात्र, विशेष बाब म्हणून जालना, यवतमाळ, सांगली, जळगाव, नागपूर, ठाण्यात अतिरिक्त केंद्र.
- अहमदनगर येथे जैवतंत्रज्ञान निर्मिती विभाग सुरू होणार.
- बुलडाण्यात लघुबीज प्रसंस्करण केंद्र व पशुपालन केंद्र उभारणार.
- नाशकात बागायती प्रक्रिया केंद्र उभारणार.
- राज्यात मृदा आणि जल परीक्षण केंद्राच्या आधुनिकीकरण प्रस्तावाला मान्यता.

विदर्भात कृषी विद्यापीठ
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणार्‍या यवतमाळ येथे केंद्रीय कृषी विद्यापीठाची स्थापना. या विद्यापीठ निर्मितीच्या प्रक्रियेला अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लगेच सुरुवात होईल.

जळगाव : टिश्यू कल्चर
केळी उत्पादनात क्रांती घडविण्यासाठी जळगावमध्ये टिश्यू कल्चर लॅब उभारणार. लवकरच याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

(फोटो - प्रदेश भाजपचे शिष्टमंडळ कृषिमंत्री राधामोहनसिंह भेटले)