आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीखविरोधी दंगलीच्या फायली पुन्हा उघडणार; SIT करणार 75 प्रकरणांची चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- १९८४ मध्ये देशभरात उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणाची आता पुन्हा चौकशी केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या दंगलीशी संबंधित ७५ प्रकरणांच्या पुन्हा चौकशीसाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमली आहे.

विशेष म्हणजे, पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करणारे एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. केंद्राच्या विशेष चौकशी समितीने आतापर्यंत एकही प्रकरण पुन्हा चौकशीसाठी घेतले नसल्यामुळे केंद्राने दिल्ली सरकारला एसआयटी नेमण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे या पत्रात म्हटले होते. त्यामुळेच गृहमंत्रालयाने हा पुढाकार घेतला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत सुमारे ३ हजारहून अधिक लोकांचे प्राण गेले होते. विशेष म्हणजे एकट्या दिल्लीतच २ हजार ७३३ जणांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी एकूण ५८७ खटले दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी २४१ खटले पुराव्यांअभावी बंद करण्यात आले. यापैकी ४ प्रकरणे २००६ आणि एक प्रकरण २०१३ मध्ये नव्याने उघडण्यात आले. यात ३५ जणांना शिक्षाही ठोठावण्यात आली.

मात्र, २३७ खटले अद्यापही थंड बस्त्यातच आहेत. त्यामुळेच गृहमंत्रालयाने ७५ प्रकरणांची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. १९८४ मध्ये उसळलेल्या या दंगलीनंतर मागील ३२ वर्षांत १० आयोग आणि समित्यांची स्थापना करण्यात आली. मात्र, पीडितांना न्याय मिळाला नाही, असा आरोप ‘आप’ने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...