आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर वर्षांपूर्वीचे दुर्मिळ आवाज आजपासून होणार ऑनलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 1931 मध्ये ब्रिटनच्या भेटीत असताना महात्मा गांधी यांनी केलेले भाषण असो किंवा शास्त्रीय संगीतातील गानतपस्वी एम. एस. सुब्बालक्ष्मी यांनी वयाच्या नवव्या वर्षी गायलेली गाणी, यांचा आस्वाद घेण्याची संधी नव्याने मिळणार आहे. भारतातील अशा दुर्मिळ आवाजांचा संग्रह असलेली ध्वनिफीत तयार करण्यात आली असून त्याचे 30 जुलै रोजी ऑनलाइन विमोचन होणार आहे. हा संग्रह लाखो रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

द अर्काइव्ह ऑफ द इंडियन म्युझिक (एआयएम) असे या संग्रहाचे नाव आहे. त्यामध्ये महान नेत्यांची भाषणे, कलावंतांची दुर्मिळ गाणी, नाटक इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. 1902 पासूनचा हा संग्रह आहे. हे मौल्यवान ध्वनी साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने ते खर्‍या अर्थाने खुले होणार आहे. संगीतविषयक पथदर्शी प्रकल्प याच वर्षी मे महिन्यात सुरू करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या ध्वनिफितीमध्ये ‘वंदे मातरम’ गीताचे ध्वनिचित्रमुद्रण आहे. त्याचबरोबर भारतीय चित्रपटाच्या सुवर्ण काळातील गायक मोहंमद रफी यांच्या पार्श्वगायनातील अनेक गीते आहेत. सदाबहार गझल, कव्वालींचाही समावेश आहे. कोलकात्याचे गौहार जान यांचे गाणे रेकॉर्ड झाले होते. ग्रामफोनवर गाणे रेकॉर्ड होणारे ते पहिले गायक होते. 1902 मधील या गायकावर संग्राहक विक्रम संपत यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यातूनच त्यांना एआयएमची कल्पना सुचली. लोकांनी आपल्याकडे धूळ खात पडलेल्या रेकार्ड्स आम्हाला द्यावेत. त्याचे डिजिटलायझेशन करून त्या आठवणी नव्याने अनुभवण्याची संधी मिळू शकते, असे आवाहन संग्राहक विक्रम संपत यांनी केले आहे.
कसा मिळाला ठेवा ?
जुन्या गझल, महान नेत्यांची भाषणे किंवा लोकसंगीत इत्यादींची आवड असणार्‍यांना ही पर्वणी ठरणार आहे. त्याचे डिजिटायझेशन करण्यात आले असून रसिकांना आपल्या आवडत्या व्यक्तीचे भाषण किंवा गाणे मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे, असे एआयएमचे संस्थापक विक्रम संपत यांनी सांगितले.
मोफत डाउनलोड
शंभर वर्षांच्या कालखंडातील राजकीय, संगीत-नाटक क्षेत्रातील दुर्मिळ आवाजांना संग्रहित करण्यासाठी ग्रामोफोनची मदत घेण्यात आली. त्यातूनच हा मौल्यवान ठेवा जतन करणे शक्य होऊ शकले. हा खासगी उपक्रम आहे. विक्रम संपत यांना या संग्रहाचे सर्व र्शेय जाते. त्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून अनेक ग्रामोफोन जमवले. त्यांनी चोरबाजारातूनही ग्रामोफोन मिळवले. त्याशिवाय युरोपातील व्हिएन्ना, बर्लिन, लंडनमधूनही त्यांनी काही ग्रामोफोन गोळा केले. त्यातून असंख्य गाण्यांचा संग्रह केला. व्यवसायाने अभियंता असलेले 33 वर्षीय संपत इतिहासतज्ज्ञ आहेत.