आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला राहुल यांच्या गैरहजरीने तर्क-वितर्क उधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रपर हिंदी “अपनी शर्तों पर’  या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन झाले. मात्र, या कार्यक्रमाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हजर न राहिल्याने तर्क-वितर्कांना ऊत आला. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, सीताराम येचुरी, डी. राजा, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, के.सी. त्यागी प्रामुख्याने उपस्थित होते. लेखक कुलदीप नायर यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. 
 
राष्ट्रवादीचे नेते खासदार डी. पी. त्रिपाठी यांना राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता त्यांनी नवीनच वाद निर्माण केला आहे. त्रिपाठी म्हणाले, शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला सोनिया गांधी प्रमुख अतिथी होत्या. आजच्या कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी यावे म्हणून त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे सोपे झाले आहे, परंतु राहुल गांधी यांना भेटणे किंवा त्यांची भेट होणे अवघड झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला.  

शरद पवार यांनी  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले,  आज देशातील अल्पसंख्याक, दलित, शोषित तसेच पीडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एक वर्ग गाईला माता मानताे, तर दुसऱ्या वर्गाचे गाईसंदर्भात विचार वेगळे आहेत. मात्र, देशातील एका मोठ्या संघटनेचे प्रमुख संपूर्ण देशात गोहत्या प्रतिबंध कायदा लागू करण्याची मागणी करतात. 

नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा  
सावरकरांना मानणारा हा वर्ग सावरकरांच्या विचारांच्या विरुद्ध वागत असल्याचा टीका या निमित्ताने पवारांनी संघावर केली. गाय ही शेतकऱ्यांना उपयुक्त आहेच; मात्र तिची उपयुक्तता संपल्यावर शेतकऱ्याने तिचे मांस खाल्ले तरी मी त्याला दोषी धरणार नाही असे सावरकरांचे विचार होते; पण आता देशात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्यामुळे भयावह वातावरण देशात निर्माण झाल्याची खंतदेखील त्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोहत्यासंदर्भात देशात निर्माण झालेले वातावरण तसेच यावर केंद्र सरकारचे होत असलेले दुर्लक्ष याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...