आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chacha Chaudhary: Reliving Pran Kumar Sharma's Legacy

एक हसू फुलले... जीवन सार्थक झाले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाचा चौधरी या विनोदी पात्राचे जनक प्राणकुमार शर्मा यांच्या या वाक्यातून त्यांचा जीवनहेतू सहज उलगडतो. 60 च्या दशकात कॉम्प्युटर फारसे माहीत नसताना चाचा चौधरी-कम्प्युटरसे भी तेज दिमाग है.. या पात्राद्वारे विनोद विश्वावर अधिराज्य गाजवणार्‍या प्राण यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा...
डोक्यावर लालचुटूक पगडी अन् बहारदार मिशांचे बुटके चाचा चौधरी आठवले की आजही आबालवृद्धांच्या चेहर्‍यावर हसू फुलते. 60 च्या दशकात फँटम व सुपरमॅन या विदेशी पात्रांच्या कॉमिक जगतात अस्सल भारतीय चाचा चौधरीने पाहता पाहता लहान-थोरांच्या मनावर गारूड केले. चाचा चौधरी व साबूच्या कथा वाचत आम्ही मोठे झालो, असे सांगणारे हजारो भारतीय बोलता -बोलता त्या कथानगरीचा एक फेरफटकाही मारून येतात. या पात्राचे जनक प्राणकुमार शर्मा यांनी मंगळवारी रात्री वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांच्या कारकीर्दीतील विनोदी पात्र व किश्श्यांचा अनमोल ठेवा अजरामर राहील. त्यांच्या निधनाने व्यंगचित्रकारितेत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी व्यक्त केले. कर्करोगामुळे त्यांचा गुरगावमधील रुग्णालयात मृत्यू झाला.

चाचा चौधरी अन् साबूच्या विश्वात...
अनेक प्रेक्षकांच्या मनात अमीट ठसा उमटवणारे प्राण यांची मुख्य दोन पात्रे म्हणजे चाचा चौधरी व गुरू ग्रहावरून आलेला त्याचा मित्र साबू. खलनायक राका, खोडकर बिल्लू, खट्याळ पिंकी, रामन आणि श्रीमतीजी ही त्यांची इतर अविस्मरणीय पात्रे आहेत.

जिसका दिमाग कम्प्युटरसे भी तेज है.. : चाचा चौधरीची निर्मिती कथाही रंजक आहे. कुमारवयीन डब्बू आणि प्रोफेसर अधिकारी या पात्रांची निर्मिती करताना या अजरामर पात्राने जन्म घेतला.

कारकीर्दीचा सुंदर वेलू ..
-दिल्लीतील ‘मिलाप’ दैनिकातून व्यंगचित्राकारितेस सुरुवात
-1959 मध्ये ‘लोटपोट’ हिंदी नियतकालिकासाठी चाचा चौधरींचे व्यंगचित्र काढले.
-1981 मध्ये ‘डायमंड कॉमिक्स’चे गुलशन राय यांच्याशी करार.

हसवत्या पात्रांची कहाणी
प्राण यांचे एका मुलाखतीतून वेचलेले शब्दकण...

1960 च्या काळात कार्टुनिस्ट नव्हते असे नाही. शंकर, कुट्टी आणि अहमद यांच्यासारखे मातब्बर लोक होते; पण ते सगळे राजकारणावर भाष्य करत. राजकारण कधी तरी मागे पडणार, हे जाणवल्यानंतर मी सामान्य पात्रे साकारायचे ठरवले. 1959 मध्ये मी चाचा चौधरी रेखाटला. चाणक्यांकडून मला यासाठी प्रेरणा मिळाली. माझ्या पात्राची बुद्धी त्यांच्यासारखीच असावी, असे मला वाटत होते. चुटकीसरशी समस्या सोडवणार्‍या चाचा चौधरींसमोरची आव्हाने वाढू लागल्यावर मी गुरू ग्रहावरून साबू बोलावला. त्यानंतर चाचा चौधरी जिला घाबरतात, असे बिन्नीचे पात्रही साकारले. ती कुणालाही घाबरत नव्हती. पाश्चिमात्य पात्र उंच, धिप्पाड, तरुण होते. माझे पात्र टकले, म्हातारे असूनही अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळेच अशी साधी पात्रे थेट मनाला भिडतात.