नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये संतती नियमन शस्त्रक्रिया शिबिरातील महिलांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय त्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेणार आहे.
गेल्या महिन्यात बिलासपूरमध्ये शिबिरात केलेल्या शस्त्रक्रियेनंतर १३ महिलांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाचा एक अधिकारी म्हणाला, बिलासपूर प्रकरणाशी संबंधित अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकार जिल्ह्यांतील मुख्य वैद्यकीय अधिकारी व त्यासंबंधित अधिका-यांची कार्यशाळा घेईल.
गेल्या काही दिवसात संतती नियमन शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा शिबिरांतील शस्त्रक्रियांवर देखरेख ठेवणारी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. देखरेखीशी संबंधित माहिती व तांत्रिक गोष्टी राज्य सरकारांना सांगितल्या जातील, असे आणखी एका अधिका-याने सांगितले.