आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhota Rajan Told Many Secretes To CBI Officer After Coming In India

डॉन रिटर्न्स : मुंबई पोलिसांचे २० अधिकारी दाऊदच्या पेरोलवर, राजनची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातून २७ वर्षांपासून फरार असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मुसक्या आवळून शुक्रवारी अखेर त्याला भारतात आणण्यात आले. इंडोनेशियातील बालीहून पोलिस आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांचे सातसदस्यीय पथक विशेष विमानाने सकाळी साडेपाच वाजता छोटा राजनला घेऊन दिल्लीच्या पालम विमानतळावर पोहोचले.

विमानतळावरून सीबीआय मुख्यालयात नेऊन छोटा राजनची झाडाझडती घेण्यात आली. चौकशीत छोटा राजनने मित्राचा शत्रू बनलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. मुंबई पोलिसातील २० हून अधिक अधिकारी दाऊदच्या पेरोलवर आहेत. त्यात एका पोलिस उपायुक्ताचाही समावेश असल्याचे त्याने सीबीआयला सांगितले. छोटा राजन २४ तासांसाठी ‘इंडिया इंटरपोल’ म्हणजेच सीबीआयच्या ताब्यात आहे. छोटा राजनची सुरक्षा लक्षात घेता त्याला दिल्लीच्या न्यायालयात हजर केले जाणार नाही. त्याच्या १५ दिवसांच्या कोठडीसाठी पोलिस न्यायदंडाधिकाऱ्यालाच सीबीआय मुख्यालयात बोलावू शकतात किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची पेशी होऊ शकते, असे सीबीआयचे प्रवक्ते देवप्रित सिंह यांनी सांगितले.

विशेष चौकशी पथकाकडून छोटा राजनची झाडाझडती
चौकशी पथक : दाऊदबाबत काय माहिती आहे? त्याने कुठे कुठे पैसे गुंतवले आहेत?
> छोटा राजन : दाऊद पाक सरकारचा पाहुणा आहे. आयएसआयशी त्याचे चांगले संबंध आहेत. कराची, इस्लामाबाद व लाहोरमध्ये त्याचा तळ आहे. त्याने बॉलीवूड, रिअल इस्टेट, भांडारगृहे व मीडिया संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे. याशिवाय दाऊद मुंबई पोलिस आणि भारतातील काही राजकीय नेत्यांनाही पैसा पुरवतो. भारतातील काही ठिकाणी विशेषत: धार्मिक स्थळांवर तो हल्ले करू शकतो.
चौकशी पथक : मध्य-पूर्वेत दाऊदचा किती व कुठे- कुठे पैसा गुंतलेला आहे?
> छोटा राजन : किती हे ठोस सांगता येणार नाही. जवळपास ७५ ठिकाणी त्याने पैसा लावला.

चौकशी पथक : मुंबईत दाऊदसाठी कोण कोण काम करतो?
> छोटा राजन : मुंबई पोलिसातील २० हून अधिक अधिकारी दाऊदच्या पेरोलवर आहेत. काही चित्रपट अभिनेते, निर्माते, गायक आणि अभिनेत्रीही दाऊदच्या पेरोलवर आहेत. राजकीय नेते व अधिकाऱ्यांपर्यंत त्यांची पोहोच आहे. त्यांच्या माध्यमातूनच तो आपले नेटवर्क कायम ठेवतो.
चौकशी पथक : परंतु मुंबई पोलिसात तर दाऊदचा कोणीच माणूस नाही?
> छोटा राजन : तुम्ही चौकशी करून घ्या.
चौकशी पथक : दाऊदच्या संपत्तीबाबत तू जे सांगितले ते सर्व चुकीचे आहे...
> छोटा राजन : नाही. माझ्या उत्तरात चूक झाली असेल. मात्र सगळे खरे आहे.
चौकशी पथक : पत्रकार जेडेची हत्या तूच केलीस?
छोटा राजन : मी त्याची हत्या केली नाही. पण मला माहिती होती. पण मी इक्बाल कासकरवर हल्ला घडवला होता. मी ज्या बिल्डर्सकडून पैसे घेत होतो, त्याच्या माध्यमातून दाऊद त्यांना धमकावत होता. इरफान माझे काम करत होता. दाऊद त्याची हत्या करू पाहत होता.
चौकशी पथक : तुझे नेटवर्क काय आहे?
छोटा राजन : मीही रिअल इस्टेट, बॉलीवूड व समाजसेवेत पैसे गुंतवतो. जे नवीन अभिनेते- अभिनेत्री मुंबईत संघर्ष करतात त्यापैकी काहींना मी समाजसेवेच्या नावाखाली मदत करायला लावतो.
चौकशी पथक : मुंबई पोलिसात तुझीही माणसे असतील?
छोटा राजन : होती. पण त्यांना हटवण्यात आले .

महाराष्ट्र सरकारचे पत्र सीबीआयला मिळालेच नाही
छोटा राजन भारतात पोहोचण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने त्याच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली होती. मात्र सीबीआयला अद्याप कोणतेही औपचारिक पत्र मिळाले नाही.
४८ तासांपूर्वीच ठरले होते ऑपरेशन छोटा राजन
छोटा राजनला सीबीआय मुख्यालयात नेण्याची योजना ४८ तास आधीच तयार झाली होती. त्यासाठी तीन पथके तयार केली होती. विमानतळाच्या तांत्रिक विभागातून काही मिनिटांच्या अंतराने ही तिन्ही पथके निघाली आणि सीबीआय मुख्यालयात पोहोचली. गोल्फ लिंक्सच्या बाजूने एक पथक तर लोधी रोडच्या बाजून दुसरे पथक पोहोचले. दहा मिनिटांनंतर पोहोचलेल्या तिसऱ्या ताफ्यात डीसीपी सोबत छोटा राजन बसला होता. या मोहिमेत बिनतारी संदेश यंत्रणा वापली नाही. १५ मिनिटांच्या प्रवासात राजन अधिकाऱ्यांशी चकार शब्दही बोलला नाही. सीबीआय मुख्यालयात त्याच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे कमांडो, सीआयएसएफ व सीआरपीएफच्या तीन तुकड्या तैनात आहेत.