आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chidambaram Defends Govt Response To Kishtwar Violence

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रविरोधी घोषणांमुळे किश्तवाडमध्ये दंगल; गृहमंत्र्यांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/जम्मू - किश्तवाडमध्ये पेटलेल्या जातीय दंगलीच्या झळा संसदेपर्यंत पोहोचल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर सोमवारी संसदेत चर्चा झाली. उत्तर देण्यासाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेत आलेले पी. चिदंबरम यांनी राष्ट्रविरोधी घोषणांमुळेच दंगल भडकल्याचे मान्य केले. याउलट मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अशा घोषणा तर 20-22 वर्षांपासून सुरू असल्याचे सांगत यात ‘नवे काय?’ असा प्रश्न केला.

भाजप नेते अरुण जेटली यांनी जम्मू-काश्मीर एका कुटुंबाची जहागिरी नाही, असे वक्तव्य केले. भडकलेले फारुख अब्दुल्ला यावर म्हणाले, ‘2002 मध्ये गुजरात सरकारने लष्करालाही येऊ दिले नव्हते. मग गुजरात काय मोदींची जहागिरी आहे काय?’ जेटली यांना रविवारी जम्मू विमानतळावरच अडवण्यात आले होते. त्यावरून हा वाद पेटला.

किचलू यांचा राजीनामा : जम्मू-काश्मिरचे गृहराज्यमंत्री सज्जाद किचलू यांनी सोमवारी राजीनामा दिला. भाजपने किचलूंवर दंगल भडकावल्याचा आरोप केला होता. दरम्यान जम्मूच्या आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी सुरू असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

गृहमंत्र्यांचे उत्तर
1. ईदचा जुलूस निघाला तेव्हा भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. स्थानिक लोकांनी विरोध केल्यानंतर या भागात दंगल भडकली.
2. सकाळी साडेदहा वाजता हिंसाचार सुरू झाला. तातडीने दुपारपर्यंत लष्कराला या भागात पाचारण करण्यात आले. लष्कराने सायंकाळी ध्वजसंचलन केले.
3. दंगलग्रस्त भागात 144 कलम लागू असल्यामुळे भाजपचे नेते अरुण जेटली यांना विमानतळावर अडवण्यात आले.

दंगलींनंतर काश्मिरात नेत्यांना रोखण्याचे नाट्य जुनेच
महाराजा हरिसिंह राज्यप्रमुख असताना या प्रकारच्या दंगलीनंतर निदर्शने करणार्‍या शेख अब्दुल्ला (फारुख अब्दुल्लांचे वडील) यांना अटक झाली होती. तेव्हा हंगामी पंतप्रधान असूनही पंडित नेहरू यांनी र्शीनगर गाठले होते. सरदार पटेल यांनी मनाई करूनही नेहरूंनी ऐकले नाही. ‘शेख आपले मित्र आहेत, तसेच एक वकील म्हणून मी त्यांच्या मदतीसाठी जात आहे,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. विमानातून उतरताच नेहरूंना अटक झाली. केंद्रातील हंगामी सरकारच्या हस्तक्षेपानंतरच नेहरूंची सुटका शक्य झाली.

जेटली यांचे आरोप
1. किश्तवाडमध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच लक्ष्य केले जात आहे.
2. दंगल पेटल्यानंतर 67 तासांनी लष्कराला पाचारण करण्यात आले.
3. यादरम्यान हिंसाचार, जाळपोळ होत राहिली. माध्यमांवरही या भागात निर्बंध लादण्यात आले होते.
4. 1990 सारखी स्थिती लागू करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
5. किश्तवाडमध्ये जाणार्‍या प्रत्येक माणसाकडे राज्य सरकार संशयाने पाहत आहे.