आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयने मला प्रश्न विचारावे, मुलाला त्रास देऊ नये, चिदंबरम यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माझा मुलगा कार्ती याला त्रास देण्याऐवजी मला प्रश्न विचारावेत, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी केले. सीबीआय चुकीची माहिती पसरवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
 
२००६ मध्ये चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री असताना एअरसेल-मॅक्सिस करारात विदेशी गुंतवणुकीला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. त्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी सीबीआयने गुरुवारी कार्ती चिदंबरम यांना बोलावले होते. मात्र कार्ती यांनी त्याला नकार दिला होता. विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी रद्द केली आहे, असा युक्तिवाद कार्ती यांनी केला होता. सीबीआयने मात्र चौकशी सुरूच असल्याचा प्रतिदावा केला होता.

चिदंबरम  यांनी ट्विट्समध्ये म्हटले आहे की, एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात एफआयपीबीने शिफारस केली आणि मी ती मंजूर केली. सीबीआयने या प्रकरणात मला प्रश्न विचारावेत. कार्तीला त्रास देऊ नये. सीबीआय चुकीची माहिती पसरवत आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात एफआयपीबीच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयसमोर जबाब नोंदवला आहे. विदेशी गुंतवणुकीत मंजुरी देणे वैधच होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एफआयपीबीच्या मंजुरीसाठी कार्ती चिदंबरम यांच्या मालकीच्या दोन कंपन्यांना एअरसेल मॅक्सिसने पैसे दिल्याचा आरोप आहे. कार्ती चिदंबरम यांना पाठवलेले समन्स हे त्याच्याशीच संबंधित आहे, असे सीबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, कार्ती चिदंबरम यांनी सीबीआयसमोर हजर राहण्यास नकार दिल्याचे वृत्त त्यांच्या वकिलाने फेटाळून लावले आहे. कार्ती हे याधीही सीबीआयसमोर हजर झाले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...