आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलांना कुणीही मुलगी देऊ इच्छित नाही, सरन्यायाधीशांनी मांडले वास्तव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वकिलांना बायको मिळवणे खूपच कठीण झाले आहे. विशेषत: दिवाणी वकिली करणाऱ्यांना इतर व्यावसायिकांच्या तुलनेत कुणीही मुलगी द्यायला उत्सुक नसते, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी म्हटले आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमात न्या. ठाकूर यांनी म्हटले, लग्नाच्या बाजारात वकिलांना कसलीही किंमत नाही. लग्नाच्या बाजारात म्हटले जाते की, तुमचा मुलगा आयएएस असेल तर ठीक, एसआयएफएस, अायपीएस व अन्य काहीही सांगाल तर हो म्हणतील. परंतु तुम्ही म्हणाल तो वकील आहे, तर लोक म्हणतील नको नको. त्यामुळे जर तुम्ही तुमचे मूल्य वाढवाल, वकिली व्यवसायात येण्याचे निकष कठीण कराल तर लग्नाच्या बाजारात तुमची पत नक्की सुधारेल.
ते म्हणाले, "एक काळ असा होता की, कुणाला इतर कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही तर लोक एलएलबी करत होते. आज देशात २० लाख वकील आहेत. खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे त्यांचा दर्जादेखील घसरला आहे. बार कौन्सिल म्हणू शकते की आमच्याकडे पुरेसे वकील आहेत. परंतु तुम्ही कुणालाही वकील बनण्यापासून रोखू इच्छित नाही. तुम्हाला या क्षेत्राचा दर्जा सुधारावा लागेल. त्याचे निकष कठीण करावे लागतील. तृतीय श्रेणीचे गुण मिळवूनही वकील होता येते, असे कुणीही म्हणता कामा नये. त्याला क्लार्क बनवा किंवा इतर काही; पण वकील नाही, असे म्हटले पाहिजे. इतर कुणी कुठे स्वीकारले नाही म्हणून त्या व्यक्तीला वकील मंडळात का स्थान मिळावे?' असा प्रश्नही न्यायमूर्ती ठाकूर यांनी विचारला.

देशभरातील लॉ कॉलेजेसची दुकानदारी बंद करा : ठाकूर
सरन्यायाधीश ठाकूर म्हणाले की, "अशी अनेक विधी महाविद्यालये आहेत, तेथे तुम्हाला फॅकल्टी दिसणार नाही, ग्रंथालय दिसणार नाही, हजेरी घेतली जात नाही. मला विश्वास आहे की असे अनेक लॉ कॉलेजेस आहेत. तेथे तुम्ही फक्त फीस जमा करा, बाकीची सगळी व्यवस्था तेच करतील. कायदेशीर पेशाबद्दल तुम्ही असे कसे काय करू शकता? यासंदर्भात बार कौन्सिल ऑफ इंडियाची जबाबदारी मोठी आहे. बार कौन्सिलने ठरवले तर अशा प्रकारची दुकानदारी बंद होऊ शकते. प्रवेशाची पात्रता कठीण बनवली जाईल, असा मला विश्वास आहे.'
बातम्या आणखी आहेत...