आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China And India Relation News In Marathi, Politics

पुन्हा भाई -भाई:चीनचा भारतापुढे मैत्रीचा हात; नोव्हेंबर महिन्यात संयुक्त कवायती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या पुढाकारानंतर चीन आणि भारत यांच्यातील अविश्वासाचे वातावरण निवळण्यास मदत होत असून चीनने भारतासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे परस्पर विश्वास केंद्रस्थानी ठेवून चीनने द्विपक्षीय सुरक्षेची नवी संकल्पना ठेवली आहे. परस्पर विश्वास, उभय देशांचा लाभ, समानता आणि सहकार्य अशी नवी चतु:सूत्री चीनने मांडली आहे.

संरक्षण क्षेत्रातील अभ्यास व विश्लेषणासाठीच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिस (आयडीएसए) तर्फे आयोजित परिषदेत बोलताना चीनचे राजदूत वेई वेई व भारतातर्फे नव्या संकल्पनेची घोषणा क रण्यात आली. या चतु:सूत्रीअंतर्गत येत्या नोव्हेंबर महिन्यात उभय देशांच्या संयुक्त कवायती आयोजित केल्या जातील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सहसचिव (चीन) गौतम बांबवले यांनी सांगितले. बांबवले परिषदेस हजर नसल्याने त्यांचे भाषण वाचून दाखवण्यात आले. परस्पर विश्वास, लाभ, समानता आणि सहकार्यावर आधारित सुरक्षेचे नव्या संकल्पनेचा प्रारंभ करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, असे चीनचे राजदूत वेई यांनी या वेळी सांगितले.

पंधरवड्यात काय घडले? : मोदी सरकार सत्तारूढ झाल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपला खास दूत परराष्ट्रमंत्री वँग यी यांना भारत दौर्‍यावर पाठवले.
या दौर्‍यात त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी उभय देशांच्या सामरिक हिताच्या दृष्टीने गहन चर्चा केली. त्यानंतर चीनच्या धोरणात आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच द्विपक्षीय संबंध सुदृढ करण्यावर चीन भर देत आहे.

सामायिक विकासाची चतु:सूत्री तीन लाख कोटींचा व्यापार
भारत -चीन यांच्यात सन 2013 आर्थिक वर्षात परस्पर व्यापार 6500 कोटी डॉलर्स (सुमारे 3 लाख 85 हजार 319 कोटी रुपये ) होता. परंतु चीनकडून यात तूट असल्याने त्यांची भारतात गुंतवणूक वाढवणे हा एक पर्याय परराष्टÑ मंत्रालयाच्या समोर आला आहे.
सहकार्याचे नवे पर्व
परस्पर विश्वास, लाभ, समानता आणि सहकार्याचे नवे पर्व अशी चतु:सूत्री चीनने मांडली आहे. त्याचप्रमाणे नव्या जागतिक अर्थव्यवस्थेत परस्परांना लाभ होईल असे धोरण राबवण्याचे चीनने म्हटले आहे.

लष्करी कवायतींमध्ये खंड
सन 2007 मध्ये उभय देशांच्या संयुक्त लष्करी कवायती प्रथम चीनच्या कुनमिंग शहरात झाल्या. त्यानंतर 2008 मध्ये कर्नाटकच्या बेळगाव शहरात झाल्या होत्या. परंतु भारतीय लष्करी अधिकार्‍यास चीनने व्हिसा नाकारल्यानंतर हा युद्ध सराव बंद करण्यात आला. त्या पाच वर्षे बंद होत्या. अखेर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चेंगडू शहरात तिसर्‍यांदा संयुक्त लष्करी सराव करण्यात आला.

भारतासोबत मैत्रीमागे चीनचा हेतू काय ?
नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना चीनचा दोन वेळा दौरा केला होता. शिवाय अमेरिकेचे मोदींविषयचे धोरण आणि देवयानी खोब्रागडे प्रकरणानंतर भारत-अमेरिकेतील संबंध ताणले गेले ते अद्यापही सुरळीत झालेले नाहीत.त्यामुळे भारतासोबत संंबंध सुधारू न अमेरिकेलाही परस्पर शह देण्याचा भारत आणि चीनचा प्रयत्न आहे.