आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या सदस्यत्वाला चीनचा विरोध नाहीच, फक्त प्रक्रियेला आक्षेप असल्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अणुपुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळण्यास चीनचा विरोध नाही. फक्त त्यासाठीच्या प्रक्रियेला विरोध आहे, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी केले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या दोन वर्षांतील उपलब्धीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज म्हणाल्या की, एनएसजीच्या सदस्यत्वासाठी चीन भारताला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे. चीनचा भारताला विरोध नाही. चीनचा फक्त निकष आणि प्रक्रियेला आक्षेप आहे. इतर देशांचाही भारताला पाठिंबा मिळेल, असे वाटते. भारताला या वर्षीच एनएसजीचे सदस्यत्व मिळेल. मी स्वत: २३ देशांच्या संपर्कात आहे. फक्त १ ते २ देशांनी काही आक्षेप घेतले आहेत. निकषाऐवजी भारताच्या विश्वासार्हतेबाबत बोलावे, असे आम्हाला वाटते. ऊर्जा धोरणासाठी एनएसजीमधील प्रवेश महत्त्वाचा आहे.

एनएसजीमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानच्या प्रयत्नांबाबत सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारत या गटाचा सदस्य नाही. त्यामुळे आम्ही त्याबाबत काही बोलणार नाही. पण आम्ही कोणत्याही देशाच्या प्रवेशाला विरोध करणार नाही. गुणवत्तेच्या आधारावर संबंधित देशाच्या अर्जावर विचार करावा, असे आम्हाला वाटते.

भारताची विविध देशांशी चर्चा : एनएसजीच्या सदस्य देशांची बैठक २४ जूनला होत आहे. त्याआधी पाठिंबा मिळवण्यासाठी भारताने विविध देशांशी चर्चा केली आहे. अमेरिकेने भारताला जाहीर पाठिंबा दिला असून, इतर देशांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

जयशंकर गेले होते चीनच्या दौऱ्यावर
चीनचा पाठिंबा मिळवण्यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर १६- १७ जूनला चीनला गेले होते, असे वृत्त आहे. त्याला दुजोरा देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप म्हणाले की, जयशंकर यांनी या दौऱ्यात चीनशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यात एनएसजी सदस्यत्वासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

रशियानेही भारताला दिला पाठिंबा
रशियानेही भारताला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहितीही सुषमा स्वराज यांनी दिली. मात्र, तुर्की, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि न्यूझीलंड या देशांचा विरोध असल्याचे समजते. चीनच्या सरकारी माध्यमांनीही भारताला प्रवेश दिल्यास चीनच्या राष्ट्रीय हिताला बाधा निर्माण होईल, असे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...