नवी दिल्ली- चीनला लागून असलेल्या सीमेवर अतिक्रमण कमी झाल्याचा दावा केंद्र सरकार करत असतानाच चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशच्या सीमेत पुन्हा एकदा घुसखोरी केली. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना पिटाळून लावले. कामेंग जिल्ह्यातील यांंगत्से क्षेत्रात ही घटना घडली.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, ९ जून रोजी चीनचे सुमारे २५० सैनिक भारतीय सीमेत घुसले. त्यांना भारतीय सैनिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर ते त्यांच्या सीमेत परत गेले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या चीन दौऱ्याला पंधरा दिवसही उलटले नाही तोच चीनने ही आगळीक केली आहे. ईशान्य भागात चिनी सैनिकांनी केलेली यावर्षीची अशा प्रकारची ही पहिली घुसखोरी आहे.
मोदी सरकारच्या धोरणांमुळे चीनकडून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या प्रकारात घट झाल्याचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला होता. अमेरिकेच्या पाठिंब्यावर भारत प्रतिष्ठित अण्वस्त्र पुरवठादार समूहाता सहभागी होण्याच्या प्रयत्नात असून चीन त्याला विरोध करत आहे. अशावेळी चीनने ही घुसखोरी केली आहे.