नवी दिल्ली - चीनी सैनिकांच्या घुसखोरीला अखेर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीच लगाम घातला आहे. भारतातील लडाख आणि इतर भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी गेल्या काही दिवसांपासून घुसखोरी सुरु केली आहे, त्यांना जिनपिंग यांनी परत फिरण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या संरक्षण खात्याच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे, की राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे. आदेशाचे पालन झाल्यानंतर तत्काळ अपडेट देखील देण्यास जिनपिंग यांनी सांगितले आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग गेल्या आठवड्यात भारत दौर्यावर होते. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यात झालेल्या शिखर बैठकीत जिनपिंग यांनी चुमारमधील चीनी सैनिक परत जातील असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, चीनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर भारतीय लष्कराने सर्व तयारी ठेवली आहे. चुमार भागात लष्कराने
आपली कुमक वाढविली आहे. दोन्ही बाजूंनी सैन्याची जमवाजमव वाढल्याने सीमेवर तणावाची स्थिती अद्यापही कायम आहे. रविवारी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत सात तंबू ठोकले होते आणि परत फिरण्यास ते तयार नव्हते. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.