(छायाचित्र संग्रहित)
नवी दिल्ली - चीनच्या सैनिकांचे खोड्या काढण्याचे सत्र सुरुच आहे. लेह लडाखमध्ये चीनी सैनिकांचे घुसखोरीचे प्रकार कायम आहेत. अशाच 22 ऑक्टोबरच्या घुसखोरीच्या एका घटनेचा खुलासा आता झाला आहे. चीनचे सैनिक यावेळी भारचीय सीमेत पाच किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. पेंगोंग तलावातही चीनच्या सैनिकांनी बोटी उतरवल्या होत्या. पण आयटीबीपीच्या जवानांनी कडक इशारा देत त्यांना परतण्यास भाग पाडले.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या सैनिकांनी आधी तलावामध्ये छोट्या नाव उतरवल्या. त्यानंतर तलावाच्या उत्तर किना-याला लागून तयार करण्यात आलेल्या मार्गाद्वारे भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा ते प्रयत्न करत होते. पण ITBP च्या जवानांनी त्यांना रोखले. दोन्ही बाजुचे सैनिक समोरासमोर होते. दोन्ही बाजुंनी हा आमचा परिसर असल्याचे बॅर दाखवले. पण अखेर चीनच्या सैनिकांना माघार घ्यावी लागली. पेंगोंग तलाव लेह पासून 168 किमी अंतरावर उंच भागात आहे. त्याचा 45 किमी परिसर भारतीय तर 90 किमीचा परिसर चीनच्या सीमेत आहे.
भारतावर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न
घुसखोरी झालेले ठिकाणी हे सीमेवरील वादग्रस्त ठिकाणांपैकी एक आहे. चीनने याठिकाणी सीरी जप परिसरात मार्ग तयार केला आङे. भारतीय सैनिकांवर मानसिक दबाव आणण्यासाठी चीनचे जवान अशाप्रकारे घुसखोरी करत असल्याची शक्यता आहे. दर महिन्याला त्यांच्याकडून होणा-या अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सप्टेंबर महिन्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारताच्या दौ-यावर आले होते. त्यावेळीही चीनच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.