आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Troops Intrude Into Indian Territory In Ladakh, Modi Will Raise This Issue To Chinese President

100हून अधिक चीनी सैनिकांची घुसखोरी, भारताने LAC वर पाठविल्या तीन बटालियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौर्‍यादरम्यानच चीनी सैनिकांनी पुन्हा एकदा घुसखोरी केली आहे. बुधवारी सकाळी चीनच्या पीपल्स लिपरेशन आर्मीचे (पीएलए) 100 हून अधिक सैनिक भारतीय सीमेवरील लडाखच्या चुमारमध्ये चार-पाच किलोमीटर आत घुसले. चीनी सैनिकांची ही संख्या 1000 च्या आसपास असल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. ही घटना जिनपिंग अहमदाबादहून दिल्लीला येण्याच्या काही तास आधी घडली आहे. गेल्या एक आठवड्यात चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी चुमार आणि डेमचोक येथे चीनी सैनिकांनी तळ ठोकला होता. तर, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात दिल्लीत शीखर बैठक होणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे, की या बैठकीत पंतप्रधान मोदी चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करतील.
100 चीनी सैनिक घुसले
भारत आणि चीन यांच्यात घुसखोरीवरुन फ्लॅग मिटींग सुरु असताना चीनच्या पीएलएच्या जवानांनी घुसखोरी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार,
मंगळवारी रात्री काही चीनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले. मात्र, त्यानंतर काही वेळातच आणखी 100 चीनी सैनिक चुमारच्या पाहाडी मार्गाने परत आले. चीनचे हे सैनिक देखील परत फिरतील असा कयास लावला जात होता. मात्र, तसे न होता घुसखोर चीनी सैनिकांची संख्या 100 वरुन वाढून 350 वर पोहोचली.
भारत-चिनचे 1000 सैनिक समोरासमोर
चीनच्या घुसखोरीनंतर भारताने चुमार मधील नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या तीन बटालियन पाठविल्या आहेत. आता दोन्ही देशांचे 1000 सैनिक समोरासमोर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या मुद्यावर चर्चा केली आहे. त्याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बातचीत करत आहेत.
फ्लॅग मिटींग ठरली होती अनिर्णीत
घुसखोरीच्या घटनेनंतर बुधवारी दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांची फ्लॅग मिटींग झाली होती. दोन्ही देशांमध्ये झालेल्या फ्लॅग मिटींगनंतरही रात्री उशिरापर्यंत तोडगा निघू शकलेला नाही. लष्करातील सूत्रांच्या माहितीनुसार, चुलुस येथील सैन्य तळावर ब्रिगेडिअर स्तरावरील अधिकार्‍यांची मिटींग झाली होती. त्यात डेमचोक भागात चीनी नागरिकांनी केलेल्या घुसखोरीवर चर्चा झाली होती. चीनी सैनिक आणि नागरिक भारतीय हद्दीत सुरु असलेल्या नहरच्या कामाला विरोध करत असल्याची माहिती आहे. लेहचे उपायुक्त सिमरनदिप सिंह यांनी सांगितले, की गेल्या एक आठवड्यापासून चीनचे लोक एलएसीजवळील डेमचोक गावात सुरु असलेल्या कामाला विरोध करत आहेत.
एक आठवड्यात घुसखोरीची तिसरी घटना
चीनने गेल्या एक आठवड्यात केलेली घुसखोरीची ही तिसरी घटना आहे. याआधी चुमार येथे पीएलएच्या जवळ 300 जवानांनी घुसखोरी करुन भारताच्या 100 जवानांना वेढा टाकला होता. 11 सप्टेंबरला चीनी सैनिक लडाखच्या डेमचोक भागात भारतीय हद्दीत 500 मीटर आत घुसले होते. या वर्षी ऑगस्टपर्यंत चीनने 334 वेळा घुसखोरी केली आहे.

छायाचित्र - लडाखभागातील डेमचोक येथे चीनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. येथे त्यांनी तंबू ठोकले आहेत आणि हाता बॅनर घेऊन सांगत आहेत, की हा त्यांचा भाग आहे. प्रत्युत्तरादाखल लडाखचे स्थानिक नागरिक सरसावले आहेत. त्यांनी तिरंगा हातात घेऊन ते चीनी सैनिकांना सामोरे गेले आहेत.