आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकामाच्या घनकचर्‍यामुळे शहरांचे पर्यावरण धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली -बांधकाम व इमारतींच्या पाडापाडीमुळे निर्माण होणारा घनकचरा विपरीत परिणाम करणारा असून त्यामुळे देशभरातील शहरांचे पर्यावरण धोक्यात येऊ शकते, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. या कचर्‍याचे योग्य नियोजन करून त्यावर फेरप्रक्रिया आणि फेरवापर करणे गरजेचे आहे असा सूर या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
केद्रीय विज्ञान व पर्यावरण केंद्र आणि पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणा यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय परिषद पार पडली. यामध्ये ‘कचर्‍याचा स्रोत म्हणून वापर’ या विषयावर विचारविनिमय करण्यात आला.
या परिषदेत केंद्रीय नागरी विकास मंत्रालय,केंद्रीय इमारत संशोधन संस्था, राष्ट्रीय सिमेंट व बांधकाम साहित्य परिषद, विविध शहरांमधील महापालिकांचे प्रतिनिधी, पर्यावरण तज्ज्ञ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शहरात झपाट्याने वाढणार्‍या इमारती, त्यांच्या बांधकाम व पाडापाडीमुळे निर्माण होणार्‍या घनकचर्‍याची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. या समस्येवर या एकदिवसीय परिसंवादात चर्चा करण्यात आली.
सन 2010 मध्ये महापालिका घनकचरा व्यवस्थापन कृती समितीने बांधकाम साहित्याच्या कचरा गोळा करणे,त्याचा वापर आणि योग्य तर्‍हेने निचरा करण्यासाठी शिफारशी केल्या होत्या. तसेच सन 2013 च्या महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या मसुद्यात या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबद्दल तरतुदी का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल विज्ञान व पर्यावरण केंद्राच्या तज्ज्ञांनी याप्रसंगी उपस्थित केला. इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍ या साहित्यामुळे व त्याच्या घनकचर्‍यामुळे जमिनीचा कस खालावतो आहे. शिवाय पर्यावरणाचीही अपरिमित हानी होते आहे.असा सूर परिसंवादात निघाला. या बांधकाम साहित्याचा फेरवापर करून त्याचे स्रोतामध्ये रूपांतर करण्यासाठी तातडीने पावले उचलली जावीत अशी मागणी उपस्थित पर्यावरण तज्ज्ञांनी केली.
फेरप्रक्रिया, फेरवापर करण्याची गरज
बांधकाम साहित्यामुळे निर्माण होणार्‍या घनकचर्‍ याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. त्यावर फेरप्रक्रिया करून त्याचा फेरवापर करणे नितांत आवश्यक आहे अन्यथा खाणींमधून होणारा अमाप वाळू उपसा व खनिज संपत्तीची लूट केल्याने जमिनीचा कस घटतो आहे त्याचबरोबर हिरवीगार वनराई, पाण्याचे स्रोत घटतील, असा इशारा विज्ञान व पर्यावरण केंद्राने दिला.