आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadanvis Inaugurate Maharashtra Dalan In Delhi

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आखणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन झाले. या वेळी प्रकाश जावडेकर.

नवी दिल्ली - महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा विश्वास व्यक्त करतानाच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन धोरण आखणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रगती मैदान येथे सुरू झालेल्या ३४ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उद्योगमंत्री प्रकाश मेहता, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तारिक फारुकी, खासदार रामदास आठवले, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील हस्तकला, कुटीर उद्योग, लघुउद्योग, महिला उद्योगात प्रचंड क्षमता आहे. महिला उद्योजकांसाठी उत्तम प्रशिक्षण, विपणन व ब्रँडिंगची व्यवस्था निर्माण करून देण्यात येईल. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर असणार आहे. महाराष्ट्रातील महिला उद्योगाला चालना देण्यासाठी उद्योग धोरणात आवश्यक ते बदल करण्यात येतील असे ते म्हणाले. महिला उद्योजकता ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्याची संकल्पना असून महाराष्ट्रातील ९७ महिला उद्योजकांनी महाराष्ट्र दालनात आपापल्या वस्तूंचे प्रदर्शन लावले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला उद्योजकांनी प्रदर्शित केलेल्या वस्तूंचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

या वेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाकडून राज्यातील उद्योगांच्या माहितीवर आधारित तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे तसेच महिला उद्योजिकांच्या यशोगाथेवर आधारित सीडी व माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.