आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्यात लवकरच स्वतंत्र कंपनी : फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईतील सागरी रस्ते प्रकल्पाचा अंतिम अध्यादेश येत्या पंधरा दिवसांत काढला जाणार अाहे. याशिवाय पुणे मेट्रोच्या सुधारित प्रकल्प अहवालानंतर तत्काळ मंजुरी देणे व महाराष्ट्रातील उर्वरित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी स्वतंत्र कंपनीची लवकरच स्थापना करण्याचा निर्णय बुधवारी नवी दिल्लीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत राज्यातील महत्त्वाचे विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडु, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, वने व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध प्रलंबित विकास प्रकल्पांच्या कामाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

जावडेकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुंबईतील सागरी रस्ते, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, पश्चिम घाट आदी विषयांवर चर्चा झाली. मुंबई सागरी मार्गाच्या प्रकल्पांबाबत नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. या सूचनांचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. सागरी मार्ग प्रकल्प नागरिकांना वाहतुकीसाठी सुलभ व्हावा यासाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण व विकास या दोन्ही बाबी विचारात घेऊनच सर्व प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, असे जावडेकर यांनी बैठकीत स्पष्ट केले. पश्चिम घाटाचे क्षेत्र निश्चित करताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जावडेकर यांनी दिले.

अहवालानंतर पुणे मेट्रोस मंजुरी
पुणे मेट्रोसंदर्भात फडणवीस यांनी नायडू यांची भेट घेतली. पुणे मेट्रो प्रकल्पाचा सुधारित प्रकल्प अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत केंद्र शासनास सादर करावा. प्रकल्प अहवाल केंद्र शासनास प्राप्त झाल्यानंतर तत्काळ या प्रकल्पास मंजुरी देण्यात येईल, असे नायडू यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. या अहवालात प्रकल्पाची सुधारित किंमत देण्यात यावी, असे निर्देशही नायडू यांनी दिले.

मुंबईत आर्थिक सेवा केंद्रासाठी प्रयत्नशील
जगातील महत्त्वाच्या शहरांप्रमाणे मुंबईत ‘आर्थिक सेवा केंद्र’ उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या वेळी अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, खासदार पूनम महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई विमानतळ, राज्यातील स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या शहरांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात अाली.
राज्यातील रेल्वेसाठी स्वतंत्र कंपनी
महाराष्ट्रातील सर्व रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना लवकरच करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कराड- चिपळूण, वैभववाडी-कोल्हापूर, अहमदनगर-बीड-परळी, लोणार-फलटण-बारामती या रेल्वे प्रकल्पांच्या कामांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. नक्षलग्रस्त भागातील रेल्वे प्रकल्पांच्या कामास तत्काळ सुरुवात व्हावी यासाठी राज्य शासनाने जमीन अधिग्रहणाचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे, अशी फडणवीस यांनी या बैठकीत दिली. वडसा-देसाईगंज ते गडचिरोली या रेल्वे प्रकल्पाचे काम येत्या मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांचा प्रत्येकी एक अधिकारी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी नियुक्त करण्यात यावा व दर आठवड्यास या अधिकाऱ्यांची बैठक व्हावी, अशी सूचना रेल्वेमंत्री प्रभू यांनी या वेळी केली.