आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Scam: CBI Names Naveen Jindal, 14 Others In Chargesheet

कोळसा घोटाळा : नवीन जिंदलसह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र, आरोपींत राव, मधू कोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी काँग्रेसचे नेते आणि उद्योगपती नवीन जिंदल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यासह १२ जणांविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच.सी. गुप्ता, जिंदल स्टील अँड पॉवर, जिंदल रिअॅल्टी लिमिटेडसह पाच कंपन्यांवर आरोप आहेत. २००८ मध्ये झारखंडच्या बिरभूममधील अमरकोंडा मुरगदनागल कोळसा खाणपट्टा वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात १५ आराेपींविरुद्धचे आरोप फसवणूक व फौजदारी गुन्ह्याअंतर्गत शिक्षेस पात्र आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पाराशर गुरुवारी आरोपपत्रावर सुनावणी घेतील. सीबीआयने कोळसा घोटाळ्यात दासरी नारायण राव, नवीन जिंदल यांच्याविरुद्ध याआधी गुन्हा दाखल केला आहे. राव केंद्रीय कोळसा राज्यमंत्री असताना जिंदल स्टील अँड पॉवर लि.(जेएसपीएल) तसेच गगन स्पोंज आयर्न प्रा.लि.(जीएसआयपीएल) या दोन्ही जिंदल यांच्या फर्म्सनी २००८ मध्ये मुरगदनागल कोळसा खाणपट्टा मिळवताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. जमीन, पाणीपुरवठा आणि याआधीच्या खाणपट्ट्यांशी संबंधित अनियमितता असल्याचा सीबीआयचा दावा आहे. जिंदल आणि त्यांच्या कंपनीने हे आरोप फेटाळले आहेत. जेएसपीएलने जानेवारी २००७ मध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांत त्यांच्याकडे तीन कोळसापट्टे असल्याची माहिती दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याकडे सहा खाणपट्टे होते, असा सीबीआयचा दावा आहे.