आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधानांच्या विशेष विमानातून - कायद्यापेक्षा मी मोठा नाही, असे स्पष्ट करून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कोळसा घोटाळ्यात सीबीआय चौकशीसाठी आपण तयार असल्याचे म्हटले आहे. कोळसा खाण वाटपाच्या प्रक्रियेत काहीही दडवण्यासारखे नसल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान गुरुवारी आपल्या विमानात पत्रकारांशी बोलत होते. कोळसा खाण वाटप घोटाळ्यात पंतप्रधानांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी करावे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला व माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर हे प्रकरण आणखीच चिघळले.
या प्रकरणात मी दोषी असेन तर ज्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले ते प्रक्रियेबाहेर कसे राहू शकतील, असा प्रश्न उपस्थित करून पारेख यांनी पंतप्रधानांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
बिर्लांच्या हिंदाल्को कंपनीला कोळसा खाण वाटप झाले त्या काळात कोळसा मंत्रालय पंतप्रधानांकडे होते. 1.86 लाख कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा तपास करणार्या सीबीआयने पंतप्रधान कार्यालयाकडूनही संबंधित व्यवहाराच्या फायली मागवल्या आहेत. 2005 मध्ये हिंदाल्कोला ओडिशातील कोळसा खाणपट्टे देण्यात आले होते. दरम्यान, बिर्लांची कंपनी हिंदाल्कोला खाणपट्टय़ाच्या वाटपाची मंजुरी पंतप्रधानांनीच 1 ऑक्टोबर 2005 रोजी दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.