आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coalgate News In Marathi, Central Vigilance Commission, Divya Marathi

केंद्रीय दक्षता आयोग घेणार सीबीआयच्या ‘कोलगेट’ तपासाचा आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरलेल्या कोट्यवधींच्या कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या सीबीआयने केलेल्या तपासाचा केंद्रीय दक्षता आयोगाकडून (सीव्हीसी) आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी सीव्हीसी-सीबीआय यांच्यात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


भ्रष्टाचार प्रतिबंधक संस्था असलेल्या सीव्हीसीचे सीबीआयच्या कोळसा खाण वाटपातील भ्रष्टाचाराच्या चौकशीवर नियंत्रण आहे. घोटाळ्यावरील अहवालासंबंधीच्या तपासात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. केंद्रीय दक्षता आयोग अहवालाचे मूल्यमापन करून त्यावर कृती करेल, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. सीबीआयने विविध प्रकारच्या 20 प्रकरणांचा तपास अहवाल दिला आहे. त्यावर दक्षता आयोग स्वतंत्रपणे मूल्यमापन करून सर्वाेच्च न्यायालयात सादर करेल. सीव्हीसीचे मत नंतर सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. कोळसा खाण वाटपातील वादग्रस्त 20 प्रकरणांची कागदपत्रे पाच दिवसांत सीव्हीसीसमोर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांच्या पीठाने दिले होते. त्यानंतर सीव्हीसी त्यावरील आपला आढावा अहवाल चार आठवड्यांत सादर करेल.


सीबीआयने अलीकडेच कोळसा खाण वाटपाच्या दोन प्रकरणांतील प्रथम चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. कोळसा खाण वाटप प्रकरणातील तपासाचे काम आम्ही चोखपणे पूर्ण केले आहे, असे सीबीआयचे म्हणणे आहे.


काय आहे आदेश
कोळसा खाण वाटप प्रकरणात सीबीआयअंतर्गत मतभेद दिसून आले. त्यामुळे शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयाने सीव्हीसीला यासंदर्भात आदेश दिला होता. त्यानुसार सीव्हीसी सीबीआयच्या तपास अहवालाचा आढावा घेणार आहे. पीई अर्थात प्राथमिक चौकशीत अनेक मतभेद असू शकतील. त्यामुळे सीव्हीसी त्याचे परिमार्जन करेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


सीलबंद अहवाल आज सोपवणार
कोळसा खाण वाटपासंबंधीच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल सीव्हीसीकडे सोपवण्याच्या सर्वाेच्च् न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. आमचा अहवाल सोमवारी आम्ही सीव्हीसीकडे सोपवू. सीव्हीसीने सुप्रीम कोर्टाकडे कोणताही सल्ला दिला तरी आम्ही त्याबाबत सकारात्मक राहू, असे सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी सांगितले.


आरोपपत्राची शिफारस
डीआयजी रविकांत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कोळसा घोटाळ्यातील दोन प्रकरणांचा तपास करण्यात आला. त्याविषयी देण्यात आलेल्या अहवालात शर्मा यांनी आरोपपत्र दाखल करण्याची शिफारस अहवालातून केली आहे.