आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधांच्या किमतींवर आता येणार कडक नियंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकार आता बाजारमध्ये उपलब्ध असणार्‍या औषधांच्या किमतीवर निगरानीची प्रक्रिया अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी थेट औषध कंपन्यांकडून त्यांच्या औषधांच्या किमतीची संप्रू्ण माहिती जमा करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या औषधांच्या किमती सरकार ठरवत नाही, अशा (नॉन शेड्युल्ड) औषधांच्या किमतीची माहिती सरकार मिळवत आहे. या औषधांच्या किमतींचा संपूर्ण तपशील असल्यास त्याच्या बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल फार्मास्युटिकल प्राइझिंग अँथॉरिटी (एनपीपीए) ने थेट कंपन्यांकडून ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे सात हजार कंपन्यांना ही माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या एनपीपीए औषधांच्या किमतींवर नियंत्रण व किंमत ठरवण्यासाठी आयएमएस हेल्थद्वारे एकत्र केल्या जाणार्‍या नमुन्यांवर अवलंबून असते. एनपीपीएकडे कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे त्यांना थेट बाजारातून नमुने गोळा करणे शक्य होत नाही. त्यामुळे आगामी काळात इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी हे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. नॉन शेड्युल्ड औषधांच्या किमती कंपन्या एनपीपीएच्या मंजुरीशिवायच ठरवत असतात.

औषध कंपन्यांना या औषधाच्या किमतींमध्ये वर्षाला 10 टक्क्याहून अधिक वाढ करता येत नाही. जर तसे झाले तर एनपीपीए औषध कंपन्यांकडून दंड वसूल करते. नॉन शेड्युल्ड औषधांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागवण्यात आलेल्या सूचनांवररून नमुने गोळा करण्यासाठी इतर संस्थांची मदत घेण्याचा विचारही केला जात आहे.
सामान्य जनतेची लूट!

न्यायालयांमध्ये प्रलंबित असणार्‍या किंमत वाढवल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये एकाच कंपनीची माहिती उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले. दरम्यान, संसदेच्या स्थायी समितीनेही औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. मंजुरीशिवाय किंमत ठरण्याच्या प्रक्रियेचा औषध कंपन्या फायदा उचलत असल्याने समान्य जनतेची लूट होत असल्याचेही समितीने म्हटले आहे. सध्या बाजारात विक्री होणार्‍या 85 टक्के औषधांच्या किमती कंपन्या स्वत:च ठरवत असतात.